
वुमन्स प्रीमियर लिग स्पर्धेतील आठव्या सामन्यात यूपी वॉरियर्सला विजयाची चव चाखता आली. आतापर्यंत यूपी वॉरियर्सने तीन सामने खेळले होते. पण तिन्ही सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. पण चौथ्या सामन्यात यूपी वॉरियर्सने मुंबई इंडियन्सला 7 गडी राखून पराभूत केलं. नाणेफेकीचा कौल यूपी वॉरियर्सच्या बाजूने लागला आणि त्यांनी प्रथम गोलंदाजी स्वीकारली. मुंबई इंडियन्सने 20 षटकात 5 गडी गमवून 161 धावा केल्या. तसेच विजयासाठी 162 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान यूपी वॉरियर्सने 18.1 षटकात 3 गडी गमवून पूर्ण केलं. मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना धीमी सुरुवात केली. पॉवर प्लेमध्ये फक्त 32 धावा आल्या. मुंबईची पहिली विकेट 43 धावांवर पडली. अमनजोत कौर 33 चेंडूत 38 धावा करून बाद झाली. त्यानंतर गुणालन कमालिनी 12 चेंडू खेळत 5 धावा करून तंबूत परतली. त्यानंतर नॅट स्कायव्हर ब्रंटने 43 चेंडूत 65 धावांची खेळी केली. तर निकोला कॅरेने 20 चेंडूत नाबाद 32 धावा केल्या. हरमनप्रीत कौरही काही खास करू शकली नाही.
यूपी वॉरियर्सने या धावांचा पाठलाग करताना सावध सुरुवात केली. मेग लॅनिंगने 26 चेंडूत 25 धावा केल्या. तर किरण नवगिरे या सामन्यातही फेल गेली. तिने 12 चेंडूत 10 धावा केल्या. फोबी लिचफिल्डही काही खास करू शकली नाही. तिने 22 चेंडूत 25 धावा केल्या. पण हरलीन देओल आणि क्लो ट्रायनने डाव सावरला. हरलीन देओलने 39 चेंडूत नाबाद 64 धावांची खेळी केली. क्लो ट्रायनने 11 चेंडूत नाबाद 27 धावा केल्या. या स्पर्धेत यूपी वॉरियर्सन चार पैकी एक सामना जिंकला आहे. सध्या खात्यात 2 गुण जमा झाले असून नेट रनरेट हा -0.906 आहे.
मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौर म्हणाली की, ‘मला 180 किंवा त्यापेक्षाही जास्त धावसंख्या हवी होती कारण आम्हाला माहित होते की या खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी करणे सोपे नाही. पण मला वाटते की आम्ही अलीकडेच पॉवरप्लेमध्ये चांगली कामगिरी केली. आम्ही विकेट गमावली नाही, पण दुर्दैवाने, बोर्डवर धावा पुरेशा नव्हत्या, पण नंतर, मला वाटते की नॅट आणि निकने आम्हाला चांगल्या परिस्थितीत आणले. पण मला वाटते की आज तिने ज्या पद्धतीने फलंदाजी केली त्याचे श्रेय हरलीनला जाते.’