
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या तिसऱ्या जेतेपदाचा निकाल लवकरच लागणार आहे. अंतिम सामन्यात सामन्यात गतविजेता ऑस्ट्रेलिया आणि पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठलेला दक्षिण अफ्रिका संघ भिडणार आहे. 11 जूनपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. त्यामुळे या सामन्यात कोण बाजी मारणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 11 जून ते 15 जून असा कसोटी सामन्याचा पाच दिवसांचा कालावधी आहे. सामन्याचा निकाल लागण्यासाठी पाच दिवस लागणार की नाही हे लवकरच कळेल. पण या महत्त्वपूर्ण सामन्यासाठी एक दिवस राखीव ठेवण्यात आला आहे. कारण पावसामुळे या सामन्यात खंड पडला तर राखीव दिवशी हा सामना पूर्ण करण्याचा मानस आहे. आयसीसीने 16 जून हा दिवस राखीव ठेवला आहे. पण या दिवसाचा उपयोग फक्त पावसामुळे सामन्यात खंड पडला तरच केला जाईल. तसं पाहीलं तर इंग्लंडमधील वातावरणाचा काही भरवसा नाही. कधीही पाऊस पडू शकतो. या सामन्यादरम्यान हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, 11 जूनला पावसाची शक्यता नाही. पण 12 जूनला पावसाची शक्यता असल्याचं सांगण्यात आलं आहे. पण हा पाऊस खूप काही पडेल असं वाटत नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशीचा खेळ काही तासांसाठी थांबवण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे तसं काही नुकसान नाही. दुसरीकडे, 13 ते 15 जून दरम्यात आकाश निरभ्र असेल. त्यामुळे हा सामना पूर्ण होईल. त्यामुळे राखीव दिवशी सामना खेळवण्याची वेळ येणार नाही. मग प्रश्न असा पडतो की, हा सामना ड्रॉ झाला तर विजेत्याची घोषणा कशी केली जाणार?
आयसीसीने या प्रश्नांवर आधीच तोडगा काढला आहे. जर सामना ड्रॉ झाला किंवा राखीव दिवशीही त्याचा निकाल लागला नाही तर दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित केलं जाईल. अनेकदा कसोटी सामना हा ड्रॉ होताना पाहीलं आहे. त्यामुळे गुणतालिकेत कोणता संघ आघाडीवर आहे आणि दुसऱ्या स्थानावर आहे याचा काहीही फरक पडणार नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका या दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित करण्यात येईल.
भारत न्यूझीलंड 2021 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पावसाने खंड पडला होता. पहिल्या दिवशीचा खेळ पावसामुळे झाला नव्हता. दुसऱ्या दिवशी नाणेफेक झाली आणि राखीव दिवसाचा उपयोग करण्याचा निर्णय घेतला गेला. तिसऱ्या दिवशी खेळ झाला. पण चौथ्या दिवशीचा खेळ पावसामुळे वाया गेला. पाचव्या दिवशी खेळ उशिराने सुरु झाला. तर राखीव दिवशी उर्वरित खेळ सुरु झाला पण न्यूझीलंडने भारताला धोबीपछाड दिला.