आर अश्विनला TNPL मध्ये महिला पंचासोबत तसं करणं पडलं महाग, मिळाली इतकी मोठी शिक्षा
भारताचा महान फिरकीपटू आर अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तर लीग स्पर्धेत अजूनही खेळत आहे. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा भाग आहे. तर तामिळनाडू प्रीमियर लीग स्पर्धेत दिंडिगुल ड्रॅगन्सची कर्णधारपद भूषवत आहे. यात लीग स्पर्धेतील एक कृत्य आर अश्विनला महाग पडलं आहे.

आर अश्विन हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील महान क्रिकेटपटू म्हणून गणला जातो. तणावपूर्ण स्थिती योग्य पद्धतीने हाताळण्याची त्याची मानसिकता आहे. त्यामुळे मोक्याच्या क्षणी त्याच्या हाती चेंडू सोपवून प्रतिस्पर्धी संघाला अडचणीत आणलं जातं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला आर अश्विनने नुकताच रामराम ठोकला आहे. त्यामुळे आता फक्त लीग स्पर्धेत खेळताना दिसत आहे. तामिळनाडू प्रीमियर लीग 2025 स्पर्धेत दिंडीगुल ड्रॅगन्सचं कर्णधारपद भूषवत आहे. असं असताना एका सामन्यात आर अश्विन आपल्या रागावर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरला. आयड्रीम तिरुप्पुर तमिजियन्स संघाविरूद्धच्या सामन्यात असं चित्र पाहायला मिळालं. यासाठी आर अश्विनला मोठा भुर्दंड भरावा लागला आहे. आर अश्विनला महिला पंचांसोबत वाद घालणं महागात पडलं. आर अश्विनला महिला पंचांनी पायचीत असल्याचा निर्णय दिला. या निर्णयामुळे आर अश्विन चांगलाच वैतागला.
नेमकं काय झालं?
आर अश्विन फलंदाजी करत होता. पाचवं षटक टाकण्यासाठी फिरकीपटू आर साई किशोरच्या हाती चेंडू सोपवला. तेव्हा त्याच्या चेंडूवर आर अश्विनने स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. पण हा प्रयत्न फसला आणि त्याच्या पॅडवर चेंडू आदळला. पंचांनी गोलंदाजी साई किशोरच्या जोरदार अपीलनंतर बाद असल्याचं घोषित केलं. पण हा चेंडू लेग स्टंपबाहेर पिच होत असल्याचं रिप्लेमध्ये स्पष्ट दिसलं. या स्थितीत फलंदाजाला बाद दिलं जात नाही. पण आर अश्विनच्या संघाने दोन्ही डीआरएस रिव्ह्यू गमावले होते. त्यामुळे या निर्णयासाठी रिव्ह्यू घेता आला नाही. त्यामुळे पंचांच्या निर्णयामुळे आर अश्विन संतापला. तसेच त्या निर्णयावरून पंचांशी वाद घातला. हा राग इतका वाढला की पॅडवर बॅटने जोरात मारला आणि डगआऊटच्या दिशेने निघाला.
आर अश्विन इतक्यावरच थांबला नाही तर डगआऊटमध्ये गेल्यावर ग्लव्ह्स फेकून दिले. त्याची कृती कॅमेऱ्यात चित्रित झाली. तसेच सोशल मीडियावर त्याचं वागणं वाऱ्याच्या वेगासारखं पसरलं. अश्विनचं असं वागणं पाहून क्रीडाप्रेमीही हैराण झाले आहेत. कारण आर अश्विनला अशा पद्धतीने वागताना क्रिकेट कारकिर्दीत कधी पाहीलं गेलं नाही. डोकं शांत ठेवून पण विरोधकांवर हावी होत त्याचा खेळ पाहीला गेला आहे. त्याच्या अशा वागणुकीनंतर त्याला शिक्षा सुनावण्यात आली आहे. सामनाधिकाऱ्यांनी त्यांच्या सामना फीमधून दंड आकारला आहे.
काय शिक्षा सुनावली?
पंचांच्या निर्णयावर नाराजगी व्यक्त केल्याने त्याच्या सामना फीच्या 10 टक्के रक्कम, तर क्रिकेट साहित्य फेकून दिल्याने 20 टक्के दंड आकारला गेला आहे. सामना फीच्या एकूण 30 टक्के दंड आकारण्यात आला आहे. टीएनपीएलच्या एका अधिकाऱ्याने क्रिकबजशी बोलताना सांगितलं की, ‘सामन्यानंतर सामनाधिकाऱ्यांनी सुनावणी घेतली. पंचाच्या निर्णयावर आक्षेप घेतल्याने 10 टक्के, तसेच क्रिकेट साहित्याचा दुरूपयोग केल्याने 20 टक्के दंड आकारला आहे. त्याने आपला गुन्हा मान्य केला आहे. ‘