
टीम इंडियाचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल याने इंग्लंड दौऱ्यातील पाचही कसोटी सामन्यांमध्ये क्रिकेट चाहत्यांची मनं जिंकली. यशस्वीने इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करत टीम इंडियासाठी बहुमूल्य धावा केल्या. यशस्वीला या कामगिरीचं रिटर्न गिफ्ट मिळालं आहे. यशस्वीने या कामगिरीच्या जोरावर आयसीसी टेस्ट बॅटिंग रँकिंगमध्ये मोठी झेप लगावली आहे. यशस्वीने या मालिकेत 400 पेक्षा अधिक धावा केल्या. तर कर्णधार शुबमन गिल याने या मालिकेत सर्वाधिक 754 धावा केल्या. शुबमनला त्याच्या या कामगिरीसाठी मॅन ऑफ द सीरिज पुरस्कारने गौरवण्यात आलं. मात्र शुबमनला इतक्या धावा करुनही रँकिंगमध्ये फटका बसला आहे.
यशस्वी आयसीसी कसोटी रँकिगंमध्ये पाचव्या स्थानावर पोहचला आहे. शुबमन यासह टॉप 5 मध्ये असलेला एकमेव भारतीय फलंदाज ठरला आहे. तर टॉप 2 मध्ये इंग्लंडचेच फलंदाज आहे.जो रुट त्याचं पहिलं स्थान कायम राखण्यात यशस्वी ठरला आहे. तर हॅरी ब्रूक दुसऱ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडचा संयमी आणि अनुभवी फलंदाज केन विलियमसन तिसऱ्या स्थानी आहे. तर ऑस्ट्रेलियाचा स्टीव्हन स्मिथ चौथ्या क्रमांकावर आहे.
एका बाजूला यशस्वीने मोठी झेप घेतलीय. तर दुसऱ्या बाजूला कर्णधार शुबमन गिल आणि उपकर्णधार ऋषभ पंत या दोघांना रँकिंगमध्ये फटका बसला आहे. पंतला दुखापतीमुळे पाचव्या कसोटीला मुकावं लागलं होतं. त्यामुळे पंतची क्रमवारीत आठव्या स्थानी घसरण झाली आहे. तर मालिकेत सर्वाधिक 754 धावा करणाऱ्या शुबमन गिल याची 4 स्थानांनी घसरण झालीय. शुबमन नवव्या स्थानावरुन थेट 14 व्या क्रमांकावर फेकला गेला आहे.
दरम्यान यशस्वी इंग्लंड विरूद्धच्या कसोटी मालिकेतील पाचही सामन्यात खेळला. यशस्वीने 41.10 च्या सरासरीने 411 धावा केल्या. यशस्वीने या मालिकेतील पहिल्या आणि पाचव्या कसोटी सामन्यात प्रत्येकी 1-1 असे एकूण 2 शतकं झळकावली. तर 2 वेळा अर्धशतक ठोकलं.
यशस्वीने आतापर्यंत कसोटी कारकीर्दीतील 24 सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. यशस्वीने या 24 सामन्यांमध्ये 50.2 च्या सरासरीने 2 हजार 209 धावा केल्या आहेत. यशस्वीची कसोटीतील 214 ही सर्वोच्च खेळी आहे. तसेच यशस्वीने कसोटीत एकूण 2 द्विशतकं, 6 शतकं आणि 12 अर्धशतकं झळकावली आहेत.