IND vs ENG : यशस्वी जयस्वालला पाकिस्तानी पंचांनी अडवलं, मग बेन डकेटसोबत वाजलं

पाचव्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसावर भारतीय फलंदाजांना वर्चस्व गाजवलं. खेळपट्टीवर चेंडू व्यवस्थित बॅटवर येत नसताना 396 धावा केल्या. तसेच विजयासाठी 373 धावांचं आव्हान दिलं. यात यशस्वी जयस्वालने शतकी खेळी केली. यावेळी मैदानात लंच ब्रेकपूर्वी वेगळंच प्रकरण पाहायला मिळालं.

IND vs ENG : यशस्वी जयस्वालला पाकिस्तानी पंचांनी अडवलं, मग बेन डकेटसोबत वाजलं
यशस्वी जयस्वालला पाकिस्तानी पंचांनी अडवलं, मग बेन डकेटसोबत वाजलं
Image Credit source: Shaun Botterill/Getty Images
| Updated on: Aug 02, 2025 | 10:26 PM

इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीच्या दुसऱ्या डावात यशस्वी जयस्वालची बॅट चांगलीच तळपली. इंग्लंडच्या बेजबॉलला त्याने जैसबॉलने उत्तर दिलं असंच म्हणावं लागेल. मधल्या कसोटीत त्याची बॅट काही फार चालली नाही. पण शेवटच्या कसोटीच्या दुसऱ्या डावात मात्र त्याने शतकी खेळी केली. यशस्वी जयस्वालने 164 चेंडूंचा सामना केला आणि 14 चौकार आणि 2 षटकार मारत 118 धावा केल्या. पण या खेळीत एक प्रसंग असा घडला की क्रीडाप्रेमींना आश्चर्याचा धक्का बसला. कारण यशस्वी जयस्वालची एक कृती पाकिस्तानी पंच एहसान राजाला अजिबात आवडली नाही. त्याने यशस्वी जयस्वालला दोनदा अडवलं. यानंतर जेव्हा जयस्वाल लंच ब्रेकसाठी तंबूत जात होता तेव्हा बेन डकेट त्याच्याकडे जाऊन त्याला डिवचलं. इथेच वादाची ठिणगी पडली आणि वाद झाला.

यशस्वी जयस्वाल तिसऱ्या दिवसाच्या लंच ब्रेकपूर्वी दुखापत होत असल्याची व्यथा पंचांकडे मांडत होता. पण पाकिस्तानी पंच एहसान रजा यांना जयस्वाल वेळकाढूपणा करण्यासाठी असं करत आहे असं वाटलं. लंच ब्रेकपूर्वी षटकं टाळण्यासाठी असं करत असावा, असा त्यांचा समज झाला. पंचांनी एकदा नाही तर दोनदा जयस्वालला खेळण्याचा इशारा दिला. दुसरीकडे, यशस्वीला पाहिल्यानंतर त्याला खूप दुखापत होत असावी असं वाटत होतं. पण तरीही पंचं एहसान रजाने त्याला फटकारलं. त्यानंतर लंच ब्रेक झाला आणि यशस्वी कर्णधार शुबमन गिलसोबत तंबूत जात होता. तेव्हा कर्णधार ओली पोपसोबत बोलला.

सर्वकाही शांतपणे सुरु होतं. पण तितक्यात बेन डकेट तिथे आला आणि काहीतरी कमेंट केली. त्याचं उत्तर यशस्वीने रागाच्या भरात दिलं. दोघांमध्ये काही सेकंद वाद झाला. हा वाद जयस्वालच्या पायाच्या दुखापती संदर्भात होता. दरम्यान, भारतीय संघाने पहिल्या डावात इंग्लंडची 33 धावांची आघाडी मोडत 396 धावा केल्या. तसेच इंग्लंडविरुद्ध एकूण 373 धावा केल्या आणि विजयासाठी 374 धावांचं आव्हान दिलं आहे. दोन दिवसांचा खेळ शिल्लक आहे. त्यामुळे या सामन्याचा निकाल लागणार हे स्पष्ट आहे. आता इंग्लंड ही धावसंख्या गाठणार का? की भारत रोखणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.