
पाकिस्तान क्रिकेट म्हणजे निव्वळ मनोरंजनाचा भाग झालं आहे. रोज काही ना काही हास्यास्पद घडामोडी घडत असतात. त्यामुळे जगभरात हासं झालं आहे. कधी मैदानात विचित्र पद्धतीने वागणं, कधी झेल पकडताना, कधी क्षेत्ररक्षण करताना, तर कधी धाव घेताना विचित्र घडामोडी घडताना दिसत आहेत. पाकिस्तानी क्रिकेटपटू आणि त्यांच्या सवयी आता जगभरातील क्रीडारसिकांसाठी मनोरंजनाचं साधन ठरलं आहे. आता वरिष्ठ संघाला पाहत ज्यूनिअर संघातही तसंच घडताना दिसत आहे. अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धा सुरु आहे. पाकिस्तानने पहिला सामना इंग्लंडविरूद्ध खेळला. या स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात पाकिस्तानला पराभवाचं तोंड पाहावं लागलं. कमी धावांचं आव्हान असूनही पाकिस्तानला गाठता आलं नाही. त्यात एक फलंदाज ज्या पद्धतीने धावचीत झाला ते पाहताना तुम्हालाही हसू आल्याशिवाय राहणार नाही.
पाकिस्तानने नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी स्वीकारली. इंग्लंडला 210 धावांवर रोखलं. त्यामुळे विजय सहज सोपा आहे असं वाटत होतं. पण फलंदाजांच्या सुमार कामगिरीमुळे पराभवाचं तोंड पाहावं लागलं. पाकिस्तानचा संपूर्ण संघ अवघ्या 173 धावांवर सर्वबाद झाला. इंग्लंडने हा सामना 37 धावांनी जिंकला. विजयी धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संपूर्ण संघ फ्लॉप गेला. 47व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर पाकिस्तानचा गोलंदाज मॉमिन कमरने फटका मारला आणि धाव घेतली. दोन्ही फलंदाजांनी पहिली धाव सहज घेतली असं वाटलं. पण मॉमिन नॉन स्ट्राईकला सहज पोहोचला होता. दुसरीकडे अली रजा क्रिझजवळ पोहोचला होता. मात्र बॅट टेकवण्याऐवजी थांबून चेंडू पाहू लागला.
इंग्लंडचा विकेटकीपर थॉमस रियूने क्षणाचाही विलंब न करताना थ्रो केलेला चेंडू पकडला आणि स्टम्प उडवला. अली रजा सहज क्रिजमध्ये पोहोचेल असा अविर्भावात होता. रिप्लेत चेंडू लागू नये म्हणून अली रजा थांबला होता. त्याला वाटलं की चेंडू येण्याच्या आतच क्रिजमध्ये पोहोचेल. पण ही चूक त्याला चांगलीच महागात पडली. तसं पाहीलं तर ही शेवटची जोडी होती आणि विजयासाठी 38 धावांची गरज होती. या जोडीने शेवटी काही फटके मारून सामना जिंकवलाही असता. पण तसं झालं नाही. धावचीत झाल्याने पाकिस्तानला 37 धावांनी पराभवाचं तोंड पाहावं लागलं.