
संजू सॅमसन फॉर्मात होता तेव्हा त्याला संधी मिळत नव्हती आणि आता संधी मिळते पण फॉर्मात नाही. संजू सॅमसनवर नशिब रूसलं आहे असंच म्हणावं लागेल. टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी त्याला प्लेइंग 11 मध्ये बसवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत. त्याला एक सोडून चार सामन्यात संधी दिली गेली. पाचव्या सामन्यातही त्याला संधी मिळणार हे निश्चित आहे. पण मागच्या चार सामन्यातील त्याची कामगिरी सुमार राहिली आहे. त्यामुळे त्याच्यावरील टीका काही केल्या थांबत नाही. त्याला कारणंही तसंच आहे. टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा तोंडावर आहे. त्यापूर्वी अशी कामगिरी कोणीही खपवून घेणार नाही. आता फिरकीपटू युजवेंद्र चहलच्या रडारवर संजू सॅमसन आला आहे. त्याने संजू सॅमसनचे अनुभवावरून कान टोचले आहे. चहल नेमका काय म्हणाला ते जाणून घेऊयात..
युजवेंद्र चहल न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेत समालोचन करत आहे. संजू सॅमसन चौथ्या टी20 सामन्यात फेल गेल्यानंतर त्याच्या मनातलं ओठावर आलं. युजवेंद्र चहल म्हणाला की, ‘मी एक दोन वेळा अपयशी झाला हे समजू शकतो. पण चार सामन्यात नाही. संजू सॅमसन 10-12 वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे. त्याच्याकडे चांगला अनुभव आहे. प्रेशर हे त्याच्यासाठी कारण असता कामा नये.’ युजवेंद्र चहलच नाही तर पार्थिव पटेलनेही त्याच्या टीकेची तोफ डागली. पार्थिव म्हणाला की, टी20 वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाने संजू सॅमसनऐवजी इशान किशनला संधी दिली पाहिजे. इशान चांगल्या फॉर्मात आहे. हे लक्षात ठेवूनच त्याला टी20 वर्ल्डकप स्पर्धेत संधी दिली पाहिजे.
न्यूझीलंडविरुद्ध चार टी20 सामन्यात संजू बॅट शांत राहिली. त्याने चार सामन्यात एकूण 40 धावा केल्या. पहिल्या सामन्यात 10, दुसऱ्या सामन्यात 6, तिसऱ्या सामन्यात 0 आणि चौथ्या सामन्यात 24 धावा केल्या. पाचवा सामना तिरूवनंतपुरम येथे होत आहे. हे संजू सॅमसनचं होमग्राउंड आहे. या मैदानात संजूला सूर गवसेल अशी अपेक्षा त्याचे चाहते करत आहेत. जर असं झालं नाही तर मात्र टी20 वर्ल्डकप स्पर्धेत फार फार तर लिंबू टिंबू संघाविरुद्ध एक संधी दिली जाईल. त्यातही फेल गेला तर बेंचवर बसण्याशिवाय पर्याय नाही.