
टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी गौतम गंभीर यांची वर्णी लागल्यापासून टीका होत आहे. त्याची शैली आणि इतर काही बाबींवर वारंवार टीका होताना दिसत आहे. इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत गौतम गंभीरच्या प्रशिक्षणाखाली बरेच बदल झाले आहे. हे बदल पाहून क्रीडातज्ज्ञ आश्चर्यचकीत झाले आहेत. आता माजी क्रिकेटपटू आणि वेगवान गोलंदाज झहीर खानने सुद्धा गौतम गंभीरच्या कोचिंग स्टाईलवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. कारण इंग्लंडविरुद्धच्या दोन्ही वनडे सामन्यात केएल राहुलला पाचव्या स्थानावर फलंदाजीसाठी पाठवलं होतं. खरं तर त्याची जागा पाचव्या क्रमांकावर असायला हवी असं त्यांचं म्हणणं आहे. केएल राहुलची जागा बदलल्याने तो दोन्ही सामन्यात फेल गेला. यावर श्रीकांतने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. आता झहीर खान यानेही याच मुद्द्याला हात घातला आहे. इतकंच काय तर या निर्णयामुळे खेळाडूंमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होऊ शकते असंही त्याने अधोरेखित केलं.
झहीर खानने क्रिकबझशी बोलताना सांगितलं की, ‘तुम्ही सांगता की फलंदाजीत लवचिकपणा असला पाहीजे. नंबर एक आणि दोनची पोझिशन तशीच राहील. पण इतरांना आपल्या पोझिशन बदलासाठी तयार राहिलं पाहीजे. पण या लवचिकपणासाठी काही नियम आहेत. काही प्रोटोकॉल फॉलो करावे लागतात. चर्चा होणं गरजेचं आहे. नाही तर असुरक्षेची भावना निर्माण होईल आणि तुम्हाला अडचणीत आणेल.’ झहीर खान अप्रत्यक्षरित्या केएल राहुलबाबतच आपलं मत मांडत होता हे दिसत आहे. झहीर खानच्या मते, संघात गरजेपेक्षा जास्त बदल नुकसान करणारं आहे. यामुळे राहुल द्रविडच्या प्रशिक्षणाखाली जास्त बदल होत नव्हते.
केएल राहुल सलग दोन वनडे सामन्यात फेल गेला आहे. त्यामुळे तिसऱ्या वनडे सामन्यात केएल राहुल की ऋषभ पंतला संधी मिळेल याबाबत चर्चा आहे. केएल राहुलला प्लेइंग इलेव्हनमध्ये घेतलं तर त्याला पुन्हा सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करावी लागणार का? सध्या टीम इंडियात उजवा डावा असा प्रकार फलंदाजीचा पॅटर्न वापरला जात आहे. त्यामुळे अक्षर पटेलला केएल राहुलच्या आधी खेळण्याची संधी मिळत आहे. पण केएल राहुल फेल गेला तर चॅम्पियन्स ट्रॉफीवर त्याचा परिणाम होऊ शकतो.