काव्या मारनच्या संघाने नव्या कर्णधाराची केली घोषणा, 28 वर्षीय खेळाडूवर टाकला विश्वास
Sunrisers Leeds New Captain: काव्या मारन यांची मालकी हक्क असलेल्या सनरायझर्स लीड्सने नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे. सनरायझर्स लीड्सने 28 वर्षीय खेळाडूवर मोठी जबाबदारी सोपवली आहे. चला जाणून घेऊयात सविस्तर..

Sunrisers Leeds New Captain: इंग्लंडच्या द हंड्रेड स्पर्धेत काव्या मारन यांचा मालकी हक्क असलेला सनरायझर्स लीड्स हा संघ खेळतो. या संघासाठी नव्या कर्णधारासाठी घोषणा करण्यात आली आहे. यावेळी संघान इंग्लंडच्या 28 वर्षीय स्टार फलंदाज जॅक क्राउली यांच्या खांद्यावर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे. यापू्र्वी संघाची धुरा हॅरी ब्रूकच्या खांद्यावर होती. पण आता ही जबाबदारी जॅक क्राउली पेलणार आहे. तर हॅरी ब्रूक या संघात एक फलंदाज म्हणून असणार आहे. जबाबदारीतून मुक्त केल्याने हॅरी ब्रूकला मोकळेपणाने फलंदाजी करता येणार आहे. आता जॅक क्राउलीच्या नेतृत्वात संघ नव्या पर्वात कशी कामगिरी करतो याकडे लक्ष असणार आहे. त्याच्या खांद्यावर संघाला जेतेपद मिळवून देण्याची जबाबदारी असणार आहे. जॅक क्राउलीने द हंड्रेड स्पर्धेत आतापर्यंत 23 सामने खेळले आहे. त्यात 30 च्या सरासरीने 540 धावा केल्या आहेत. त्यात तीन अर्धशतकांचा समावेश आहे. मागच्या पर्वात त्याने 40 च्या सरासरीने 9 सामन्यात 280 धावा केल्या होत्या.
चेन्नईच्या भारतीय मिडिया समूह असलेल्या सन ग्रुपने गेल्या वर्षी नॉर्दन सुपरचार्जर्सला 1155 कोटी रुपयांना खरेदी केलं होतं. यॉर्कशायरने ईसीबीच्या 49% हिश्श्याव्यतिरिक्त, सुपरचार्जर्समधील आपला 51% हिस्सा विकण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सन ग्रुपचा या कंपनीवर 100% मालकी हक्क आहे. नॉर्दर्न सुपरचार्जर्स ही लीड्स-मधील फ्रँचायझी आहे. त्यामुळे फ्रेंचायझीच्या नावात फेरफार करण्यात आला आहे. काव्या मारन यांचा ट्रेड मार्क असलेल्या सनरायझर्सचा वापर यात करण्यात आला आहे. त्यामुळे या संघाचं नाव आता सनरायझर्स लीड़्स असणार आहे. आयपीएलमध्ये काव्या मारन यांच्या संघाचं नाव सनरायझर्स हैदराबाद आणि एसए20 मध्ये सनरायझर्स ईस्टर्न केप आहे. दरम्यान, सनरायझर्स हैदराबाद संघाचा कर्णधारही बदलण्याची शक्यता आहे. कारण पॅट कमिन्स पुढच्या पर्वात खेळेल की नाही सांगणं आता कठीण आहे.
सनरायझर्स लीड्स संघ: टॉम अल्सॉप, हॅरी ब्रूक,जॅक क्राउली, डॅन लॉरेन्स, रायन रिकेल्टन, एड बर्नार्ड, ब्रायडन कार्स, बेनी हॉवेल, टॉम लॉस, मिचेल मार्श, लियाम पॅटरसन-व्हाइट, अबरार अहमद, नॅथन एलिस, मॅथ्यू पॉट्स, रीस टोपले