ZIM vs IND: कॅप्टन शुबमनकडून विराट कोहलीच्या या विक्रमाची बरोबरी

Zimbabwe vs India T20i Series: शुबमन गिलच्या नेतृत्वात टीम इंडियाला पहिल्याच सामन्यात पराभूत व्हावं लागलं. त्यामुळे शुबमनवर टीका करण्यात आली. मात्र त्यानंतर शुबमनने टीम इंडियाला चारही सामन्यात विजय मिळवून दिला.

ZIM vs IND: कॅप्टन शुबमनकडून विराट कोहलीच्या या विक्रमाची बरोबरी
virat kohli and shubman gill
| Updated on: Jul 15, 2024 | 11:40 PM

टीम इंडियाचा झिंबाब्वे दौरा आटोपला आहे. टीम इंडियाने झिंबाब्वे विरुद्धची टी 20 मालिका ही 4-1 फरकाने जिंकली. टीम इंडियाला शुबमन गिल याच्या नेतृत्वात पहिल्याच सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. मात्र त्यानंतर टीम इंडियाच्या युवा ब्रिगेडने जोरदार मुसंडी मारली. टीम इंडियाने सलग 4 सामने जिंकले. शुबमन गिल कर्णधार म्हणून यशस्वी ठरला. अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत समवयस्क खेळाडूंसह झिंबाब्बे विरुद्धची मालिका शुबमनसाठी खडतर आव्हान होतं. मात्र शुबमनने मोहिम यशस्वी करुन दाखवली. शुबमनने या मालिका विजयासह माजी कर्णधार विराट कोहली याच्या खास विक्रमाची बरोबरी केली आहे. शुबमन परदेशात एका मालिकेत सर्वाधिक सामने जिंकणारा भारतीय कर्णधार ठरला आहे.

विराट विक्रमाची बरोबरी

शुबमन गिलने परदेश दौऱ्यात एका टीम विरुद्ध टी 20 मालिकेत सर्वाधिक सामने जिंकणारा कर्णधार असा लौकीक मिळवला आहे. शुबमनआधी हा विक्रम रनमशीन विराट कोहली याच्या नावावर होता. विराटने 5 वर्षांआधी टीम इंडियाला आपल्या नेतृत्वात 4 टी 20 सामने जिंकून दिले होते. विराटने न्यूझीलंड दौऱ्यात 2019-20 मध्ये पहिल्या 4 टी 20 सामन्यात विजय मिळवून दिला होता. तर पाचव्या सामन्यात रोहित शर्मा याने नेतृत्व केलं होतं.

शुबमनने झिंबाब्वे विरूद्धच्या टी 20 मालिकेत कर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळली. शुबमनने हा संपूर्ण अनुभव बीसीसीआय टीव्हीसोबत शेअर केला. शुबमनने या मुलाखतीत खूप काही सांगितलं. शुबमन काय म्हणाला हे आपण जाणून घेऊयात.

“मी या खेळाडूंसह वेगवेगळ्या स्थितीत खेळलो आहे. त्यामुळे कॅप्टन म्हणून माझं काम सोपं झालं. मी माझं पहिलंवहिलं आंतरराष्ट्रीय शतक झिंबाब्वेत केलं होतं. पहिल्यांदाच कॅप्टन्सी करणं आणि मालिका जिंकणं हे माझ्यासाठी निश्चितपणे खास आहे. या मालिकेचं वर्णन एका शब्दात करायचं झालं त मी ‘शानदार’ असंच म्हणेन”, असं शुबमनने म्हटलं.

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : शुबमन गिल (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), रियान पराग, रिंकू सिंग, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, तुषार देशपांडे आणि मुकेश कुमार.

झिम्बाब्वे प्लेइंग ईलेव्हन : सिकंदर रझा (कर्णधार), वेस्ली मधेवेरे, तादिवानाशे मारुमणी, ब्रायन बेनेट, डिओन मायर्स, जोनाथन कॅम्पबेल, फराज अक्रम, क्लाइव्ह मदांडे (विकेटकीपर), ब्रँडन मावुता, रिचर्ड नगारावा आणि ब्लेसिंग मुझाराबानी.