
लीड्स कसोटी सामन्यात टीम इंडियाच्या टॉप ऑर्डर फलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतरही इंग्लंडविरुद्ध 5 विकेट्सनी पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांच्या आणि खालच्या ऑर्डरच्या फलंदाजांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. याशिवाय शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील संघावर फिल्डींगसाठी बरीच टीका होत आहे. भारतीय संघाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने संघाच्या पराभवावर दुःख व्यक्त केलं असून आता क्रिकेट चाहत्यांना अनेक प्रश्न विचारले आहेत. त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ अपलोड करत भारताच्या पराभवानंतर चाहत्यांना अनेक प्रश्न विचारले आहेत.
दिनेश कार्तिकचे सवाल
भारतीय संघाचा माजी विकेटकीपर आणि समालोचक असलेला दिनेश कार्तिक याने लीड्स कसोटी सामन्यात भारतीय संघाच्या पराभवाबद्दल दु:ख व्यक्त केलं. त्याने त्याच्या इंस्टाग्राम पेजवर एक व्हिडिओ अपलोड केला असून क्रिकेट चाहत्यांना अनेक प्रश्न विचारले आहेत. टीम इंडियाचा हा पराभव सामान्य गोष्ट असू शकत नाही. तुम्ही सर्वांनी मला कमेंटमध्ये सांगा की, टीम इंडिया कुठे चुकली? असा सवाल त्याने चाहत्या्ंना विचारला आहे.
मी वाट पाहीन
या व्हिडीओत कार्तिक पुढे म्हणाला की, टीम इंडियाने या कसोटीच्या दोन्ही डावांत मिळून 835 धावा केल्या, त्यामध्ये पाच शानदार शतकांचा समावेश होता. असं केल्यानंतर कोणत्याही संघाने सामना गमावलेला नाही. जसप्रीत बुमराहला दुसऱ्या टोकाकडून सपोर्ट न मिळाल्याने असं झालं का ? आपल्या फील्रडर्सनी निराश केलं का? की दोन्ही डावात खालच्या फळीच्या फलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे (41 धावांत 7 बळी आणि 33 धावांत 6 बळी) की आणखी काही? तुम्ही मला कमेंटमध्ये उत्तर द्या. मग मी परत येऊन तुम्हाला सांगेन की भारताने हा सामना कसा गमावला? पण त्यापूर्वी तुम्ही या प्रश्नांची उत्तर द्यावीत असं मला वाटतं. मी वाट पाहीन, असं दिनेश कार्तिकने म्हटलं. यापूर्वी दिनेश कार्तिकने टीम इंडियाच्या खालच्या फळीतील फलंदाजांना लक्ष्य केले होते.
टीम इंडियाची कुत्र्याशी तुलना
माजी भारतीय खेळाडू असलेल्या दिनेश कार्तिकने दुसऱ्या डावात भारताच्या खालच्या फळीतील फलंदाजांच्या खराब कामगिरीवर जोरदार टीका केली होती. समालोचक इयान वॉर्ड आणि माईक अर्थ्टन यांच्याशी बोलताना त्यांनी भारताच्या खालच्या फळीतील आक्रमक फलंदाजांची तुलना डॉबरमॅन कुत्र्याशी केली. “डॉबरमॅन कुत्र्याप्रमाणेच, भारतीय टीमचं डोकं ( टॉप ऑर्डर) चांगलं आहे. तर मिडल ऑर्डरही चांगली आहे मात्र त्याचं टेल, म्हणजे तळाचे फलंदाजी चांगली नाही”असं त्याने म्हटलं होतं. पहिल्या कसोटीत उत्तम सुरुवात केल्यानंतर, टीम इंडियाने पहिल्या डावात 41 धावांत सात विकेट्स आणि दुसऱ्या डावात फक्त 33 धावांत सहा विकेट्स गमावल्या. यामुळे टीम इंडियाला लीड्स कसोटी सामन्यात पराभव स्वीकारावा लागला.
लीड्समध्ये बनले अनेक रेकॉर्डस
भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात अनेक विक्रम झाले. इंग्लंडमध्ये 35 वर्षांनंतरची ही पहिलीच कसोटी होती ज्यामध्ये चारही डावांमध्ये 300 पेक्षा जास्त धावा झाल्या. याशिवाय, या कसोटी सामन्यात 1673 धावा झाल्या, जी दोन्ही संघांमधील खेळल्या गेलेल्या कोणत्याही कसोटी सामन्यातील सर्वोच्च धावसंख्या आहे.