डेवॉन कॉनवेने 125 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड तोडला, इंग्लंडमध्ये इतिहास रचला, अशी कामगिरी करणारा न्यूझीलंडचा तिसरा खेळाडू!

| Updated on: Jun 04, 2021 | 7:29 AM

न्यूझीलंडचा 29 वर्षीय सलामीवीर डेवॉन कॉनवेने (Devon Conway) लॉर्ड्स कसोटीच्या पहिल्याच दिवशी पदार्पणाच्या सामन्यात त्याने शतकाची चव चाखून इंग्लंड संघाच्या तोंडचं पाणी पळवलं आणि दुसऱ्या दिवशी दणदणीत दुहेरी शतक ठोकलं.

डेवॉन कॉनवेने 125 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड तोडला, इंग्लंडमध्ये इतिहास रचला, अशी कामगिरी करणारा न्यूझीलंडचा तिसरा खेळाडू!
डेवॉन कॉनवे
Follow us on

मुंबई : क्रिकेटमधले रेकॉर्ड तोडण्यासाठीच असतात.. न्यूझीलंडचा 29 वर्षीय सलामीवीर डेवॉन कॉनवे (Devon Conway) डोंगराएवढे विक्रम मोडत आहे. लॉर्ड्स कसोटीच्या पहिल्याच दिवशी पदार्पणाच्या सामन्यात त्याने शतकाची चव चाखून इंग्लंड संघाच्या तोंडचं पाणी पळवलं. दुसऱ्या दिवशीही त्याने आपल्या रेकॉर्ड पुस्तकाला तिथूनच लिहायला सुरु केलं जिथे त्याने पहिल्या दिवशीशी अल्प विराम घेतला होता.न्यूझीलंडने पहिल्या दिवशी 3 बाद 246 धावा केल्या, त्यामध्ये लॉर्डसवर पदार्पण करताना डेवॉन कॉनवेने दमदार शतक ठोकलं होतं. (England vs New Zealand Devon Conway break 125 year old record Lords test)

पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत डेव्हन कॉनवे 136 धावांवर नाबाद राहिला. तिथपासून त्याने दुसर्‍या दिवशी आपला खेळ पुढे नेला. दुसर्‍या दिवशी अपेक्षेप्रमाणे, कॉनवे आणखी काही मोठे विक्रम मोडीत काढेल, असा दिग्गजांनी वर्तवलेला अंदाज त्याने खरा करुन दाखवला. दुसर्‍या दिवशी फलंदाजी करताना त्याने 125 वर्ष जुना विक्रम मोडित काढला. 125 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत इंग्लंडमध्ये त्याने एक अनोखा इतिहास रचला.

125 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड तोडला…!

लॉर्डस कसोटीच्या दुसर्‍या दिवशी डेव्हन कॉनवेने 150 धावांचा टप्पा ओलांडला आणि 155 वी धाव घेताच तो इंग्लंडमध्ये पदार्पणात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. 1896 सालचा के एस रणजितसिंग यांचा रेकॉर्ड कॉनवेने तोडले. 263 व्या चेंडूवर कॉनवेने हे यश मिळवलं.

अशी कामगिरी करणारा न्यूझीलंडचा तिसरा फलंदाज

पदार्पणाच्या सामन्यात 150 धावा ठोकणारा डेवॉन कॉनवे न्यूझीलंडचा तिसरा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी 1999 मध्ये एम सिनक्लेअरने वेलिंग्टन कसोटीत 214 धावा केल्या, तर 2013 मध्ये एच रुदरफोर्डने 171 धावांची खेळी केली होती.

आता कॉनवेच्या निशाण्यावर हा विक्रम

29 वर्षीय किवी फलंदाजाने पदार्पण करत असताना अनेक विक्रम मोडले आहेत आणि आता त्याच्या निशाण्यावर आहे डावखुऱ्या हाताने फलंदाजी करतानाचा सर्वाधिक धावा करणारा विक्रम…. या यादीमध्ये दक्षिण आफ्रिकेचा जॅक रुडोल्फ सध्या 222 धावा करुन अव्वल स्थानी आहे. कॉनवे जरी मूळचा दक्षिण आफ्रिकेचा असला, तरी क्रिकेट न्यूझीलंडकडून खेळतो आहे आणि त्याला त्याच्या सहकारी खेळाडूंची साथ मिळाली तर तो कदाचित या विक्रमाच्या उंबरठ्यावर पोहोचण्याचीही शक्यता आहे.

(England vs New Zealand Devon Conway break 125 year old record Lords test)

हे ही वाचा :

तो आला, त्याने इंग्लंडला झोडलं, पदार्पणात लॉर्ड्सवर षटकाराने दुहेरी शतक ठोकलं, कॉनवेचा वर्ल्ड रेकॉर्ड!

WTC Final : लॉर्ड्सवर खणखणीत शतक, न्यूझीलंडच्या सलामीवीराचं भारताला थेट चॅलेंज