Sunil Gavaskar : जितकी नावाची चर्चा अजून तसं खेळणं वैभव सूर्यवंशीला जमत नाहीय, त्यावर सुनील गावस्कर म्हणाले की..
Sunil Gavaskar : भारताचे अव्वल क्रिकेटपटू आणि सध्याचे प्रसिद्ध क्रिकेट समालोचक सुनील गावस्कर यांनी त्यांच्या स्तंभात टीम इंडियाचा युवा स्टार खेळाडू वैभव सूर्यवंशीबद्दल मोठं भाकीत केलं आहे. सुनील गावस्करांनी वैभव सूर्यवंशीच्या खेळाचं अचूक विश्लेषण केलं आहे.

भारताचा युवा क्रिकेटर वैभव सूर्यवंशी मागच्या काही काळापासून चर्चेत आहे. अलीकडे दुलीप ट्रॉफी टुर्नामेंटमध्ये वैभवने आपली क्षमता दाखवून दिली. आगामी अफगाणिस्तान विरुद्ध टी20 सीरीजमध्ये वैभव धावांच्या राशी उभारु शकतो. वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी वैभव सूर्यवंशीने आपल्या फलंदाजीने सर्वांच लक्ष वेधून घेतलय. आता भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर सुद्धा वैभवच्य समर्थनार्थ पुढे आले आहेत. सुनील गावस्कर यांच्या मते “वैभव सूर्यवंशीमध्ये एकट्याच्या बळावर सामन्याची दिशा पलटण्याची क्षमता आहे.त्यांच्यावर विश्वास कायम ठेवला पाहिजे”
मिड-डे मध्ये सुनील गावस्कर यांनी लिहिलेल्या स्तंभात म्हटलय की, “टी 20 क्रिकेटमध्ये प्रत्येक सामन्यात मोठी खेळी करणं कुठल्याही फलंदाजासाठी सोपं नाहीय. पण वैभव असा प्लेयर आहे, जो 10 पैकी 3 किंवा 4 सामन्यात तुफानी इनिंग खेळून प्रतिस्पर्धी टीमला मॅच बाहेरचा रस्ता दाखवू शकतो”
वैभवने त्याच्या खेळात काय बदल केलाय?
“वैभव मोठी इनिंग खेळू शकला नाही तरी तो 1.5 किंवा 2 ओव्हर्समध्ये 25-30 धावा करुन टीमला दणकट सुरुवात देऊ शकतो. वैभवशी बोलल्यानंतर तो एक समजूतदार खेळाडू असल्याचं लक्षात येतं. त्याने आपल्या खेळात खूप लवकर बदल केला आहे. आधी तो फक्त सरळ आणि ऑन साइडला फटके मारायचा. पण आता त्याच्याकडे मैदानातील प्रत्येक कोपऱ्यात षटकार मारण्याची क्षमता आहे” असं सुनील गावस्कर म्हणाले.
सर्वात मोठा मॅच विनर ठरु शकतो
गावस्कर यांच्या मते वैभव अजून वयाने लहान आहे. जस-जसा त्याला सामन्यांचा अनुभव मिळेल, तस तसा तो अजून खतरनाक फलंदाज बनत जाईल. इंग्लंड दौऱ्यानंतर झिम्बाब्वे टूरमध्ये वैभवने दोन अर्धशतकं फटकावून दाखवून दिलं की, त्याच्यात टिकण्याची आणि धावा बनवण्याची क्षमता आहे. आगामी आशियाई गेम्स मोठ्या टुर्नामेंटमध्ये वैभव सूर्यवंशी सर्वात मोठा मॅच विनर ठरु शकतो.
टीम इंडियाची फिल्डिंग खूप खराब
आशियाई गेम्समध्ये भारतासाठी आव्हान सोपं नसेल. बांग्लादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान सारख्या टीम्स भारतासमोर कडवं आव्हान उभं करतील असं गावस्करांनी लिहिलय. अलीकडेच इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाची फिल्डिंग खूप खराब होती. टी20 क्रिकेटमध्ये जय-पराजयातील अंतर खूप कमी असतं. म्हणून भारताला आपल्या फिल्डिंगमध्ये सुधारणा करावी लागेल.