जगातील असा एक क्रिकेटपटू, ज्याचा नोटांवर फोटो, भारताशी आहे खास कनेक्शन !
फ्रँक वॉरेल हे जगातील एकमेव क्रिकेटपटू आहेत, ज्यांचा फोटो नोटांवर छापला आहे. वेस्ट इंडीज संघाचे माजी कर्णधार असलेल्या वॉरेल यांचे बारबाडोस देशात अनन्यसाधारण योगदान आहे. त्यांचे भारताशीही एक खास कनेक्शन आहे; त्यांनी 1962 मध्ये भारतीय कर्णधार नरी कॉन्ट्रॅक्टर यांना रक्त दान केले होते. त्यांच्या खेळाडूवृत्तीमुळे ते आजही स्मरणात आहेत.

जगभरातील नोटांवर तिथल्या राष्ट्रपुरुषांचे, महापुरुषांचे, पंतप्रधान वा राष्ट्रपतींचे किंवा राजाचे किंवा देवतांचे फोटो छापलेले असतात. त्या व्यक्तीच्या प्रतिचा आदर व्यक्त करण्यासाठी हे फोटो छापले जातात. ज्यांचे देशासाठी अनन्यसाधारण योगदान आहे, अशी लोकच फोटोंवर विराजमान होत असतात. पण एखाद्या क्रिकेटपटूचा नोटांवर फोटो असल्याचं कधी ऐकलं का तुम्ही? एका देशाने ही करामत केली आहे. या देशाने त्यांच्या देशाच्या नोटांवर त्यांच्या क्रिकेटपटूचा फोटोच छापला आहे. यावरून हा क्रिकेटपटू किती महान असेल आणि या देशातील जनता त्याच्यावर किती प्रेम करत असेल हे स्पष्ट होतं.
या क्रिकेटपटूचं नाव आहे फ्रँक वॉरेल. वेस्ट इंडीज संघाचा माजी कर्णधार. खरंतर वेस्ट इंडीजची टीम एका देशाची नसून द्वीपीय देशांच्या समूहाची टीम आहे. त्यातच बारबाडोस हे एक आहे. महान ऑलराऊंडर गॅरी सोबर्स सुद्धा हे बारबाडोसचे आहेत. फ्रँक वॉरेल यांच्या क्रिकेटमधील योगदानावर सेंट्रल बँक ऑफ बारबाडोस बेहद फिदा आहे. त्यामुळेच बँकेने नोटावर फ्रँक वॉरेल यांचा फोटो छापला आहे. यावरून या देशातील जनता फ्रँक वॉरेल यांच्यावर किती निस्सीम प्रेम करते हेच स्पष्ट होतंय.
कमी वयात मृत्यू
विशेष म्हणजे हा महान क्रिकेटपटू अधिक काळ जगला नाही. वॉरेल यांचं वयाच्या 42व्या वर्षीच निधन झालं. त्यांनी वेस्ट इंडिजसाठी 51 टेस्ट मॅच खेळल्या होत्या. त्यांनी या कसोटी सामन्यात 49.48च्या सरासरीने 3860 धावा केल्या आहेत. त्यांनी 69 विकेटही घेतलेले आहेत. त्यांनी बारबाडोस आणि जमैकासाठी 208 फर्स्ट क्लास मॅचेसही खेळल्या आहेत. वॉरेल हे अत्यंत जबरदस्त खेळाडू होते. माणूस म्हणूनही ते महान होते. विरोधी टीमसोबतच्या खेळाडूंसोबतचे त्यांचे संबंध अत्यंत चांगले होते.
असं आहे भारताशी कनेक्शन
वॉरेल यांच्यासोबत क्रिकेट खेळलेले असंख्य क्रिकेटर आजही त्यांच्या स्वभावाचं कौतुक करतात. वॉरेल यांचा तर भारतीय टीममधील एका खेळाडूशी तर रक्ताचं नातंही आहे. म्हणजे त्यांनी भारतीय संघाचे माजी कर्णधार नरी कॉन्ट्रॅक्टर यांना रक्त दिलं होतं. 1962 मधील ही गोष्ट आहे. तेव्हा वॉरेल हे भारताच्या दौऱ्यावर आले होते.
यावेळी एका मॅचमध्ये कॉन्ट्रॅक्टर यांना मार लागला होता. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात नेईपर्यंत त्यांचं रक्त बरंच वाहून गेलं होतं. त्यामुळे डॉक्टरांनी कॉन्ट्रॅक्टर यांना रक्त चढवावं लागेल तरच उपचार होतील असं सांगितलं होतं. तेव्हा वॉरेल यांनी कोणतेही आढेवेढे न घेता कॉन्ट्रॅक्टर यांना आपलं रक्त दिलं होतं.
