तू तर आमची गोल्डन गर्ल…; विनेशसाठी बहीण ‘दंगल गर्ल’ गीता फोगाटची भावनिक पोस्ट

Geeta Phogat Post About Vinesh Phogat Disqualification : विनेश फोगाटचं जेतेपदाचं स्वप्न भंग झालं आणि करोडो भारतीयांच्या डोळ्यात पाणी आलं. विशेनच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट लिहिल्या जात आहेत. विनेशची बहिण गीता फोगाटनेदखील एक पोस्ट शेअर केली आहे. वाचा...

तू तर आमची गोल्डन गर्ल...; विनेशसाठी बहीण दंगल गर्ल गीता फोगाटची भावनिक पोस्ट
विनेश फोगाट
Image Credit source: Instagram
| Updated on: Aug 08, 2024 | 3:44 PM

100 ग्रम वजन जास्त भरल्यामुळे भारताची कुस्तीपटू विनेश फोगाटचं गोल्ड मेडल मिळवण्याचं स्वप्न अधुरं राहिलं. 50 किलो वजनीगटातून विनेश खेळत होती. मात्र फायनलच्या आधी तिचं वजन केलं तेव्हा 50 किलो पेक्षा 100 ग्रॅम तिचं वजन जास्ती भरलं. त्यामुळे तिला अपात्र ठरवलं गेलं. जेव्हा विनेशला स्पर्धेतून बाहेर केलं गेलं, तेव्हा हजारो भारतीयांचा स्वप्नभंग झाला. सोशल मीडियावर तिच्या समर्थनार्थ पोस्टचा महापूर आला. विनेश फोगाटच्या कुटुंबियांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. विनेशची चुलत मोठी बहीण ‘दंगल गर्ल’ गीता फोगाटने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे.

विनेशसाठी गीताची खास पोस्ट

विनेश तू तर आमची गोल्डन गर्ल आहेस. तू जे केलं, ज्या पद्धतीने खेळलीस, त्याला इतिहास कायम लक्षात ठेवेन. जीवन एक संघर्ष आहे आणि त्या संर्घर्षाचं नाव विनेश फोगाट आहे… एका क्षणाला तू ऑलिम्पिन फायनलमध्ये पोहोचून इतिहास रचतेस आणि दुसऱ्या क्षणी दुर्दैवाने सगळं हातून निसटून जातं. तुला आता ज्या वेदना होत असतील. त्याची आम्ही कल्पनाही करू शकत नाही. पण प्रत्येक खऱ्या भारतीयाच्या डोळ्यात आज पाणी आहे, असं गीता फोगाटने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

गीताकडून विनेशला प्रोत्साहन

2023 मध्ये दिल्लीत कुस्टीपटूंनी आंदोलन केलं. तेव्हा त्यांचं आंदोलन पोलिसांकडून चिरडण्यात आलं. भाजपचे खासदार आणि कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष ब्रीजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप महिला कुस्तीपटूंनी केले होते. या आंदोलनात विनेश फोगाट देखील होती. तेव्हाच्या त्या आंदोलनातील फोटो आणि आता ऑलिम्पिक सेमी फायनल जिंकली तेव्हाचा विनेशचा फोटो गीताने इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. ‘ज़माना झुकता है, बस झुकाने का जुनून होना चाहिए’ असं कॅप्शन गीताने या फोटोंना दिलंय.

विनेशने सेमी फायनल मॅच जिंकली होती. तेव्हा गीताने एक पोस्ट लिहिली होती. यात तिने विनेशचं तोंडभरून कौतुक केलं होतं. तू देशाची शान आहेस. फायनलमध्ये पोहोचून इतिहास रचला आहेस. ऑलिम्पिकमधलं सिल्व्हर मेडल जिंकलंस आता गोल्डसाठी खेळशील. वडिलांचं स्वप्न पूर्ण झालं. भावूक करणारा क्षण, अशी पोस्ट गीताने शेअर केली होती.