
दुबईत 21 सप्टेंबर रोजी आशिया चषक 2025 च्या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान सामना खेळला गेला. या सामन्यात सुपर-4मध्ये भारताने पाकिस्तानला त्याची जागा दाखवून दिली. भारताने 6 विकेट्सने मात करत विजय मिळवला. तसेच फायनलच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे. दरम्यान, पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौफ (Haris Rauf )च्या कृत्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्याने केलेल्या कृत्यावर अनेकांनी संताप व्यक्त केला. पण हारिस रौफच्या पत्नीने मात्र त्याला पाठिंबा दिला आहे.
हारिस रौफने नेमकं काय केलं होतं?
भारत-पाकिस्तान सामन्यात हारिस रौफ सतत भारतीय फलंदाजांना उकसवण्याचा प्रयत्न करत होता. त्याने दुसऱ्या डावात तर सर्व मर्यादाच ओलांडल्या. फलंदाजी करत असताना त्याने मैदानातील प्रेक्षकांना हाताने एअरक्राफ्ट पडल्याची अॅक्शन करुन दाखवली. सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या रौफला स्टेडियममधील भारतीय चाहत्यांनी थेट त्याची जागा दाखवून दिली. चाहत्यांनी त्याला थेट विराट कोहलीची आठवण करुन दिली. रौफची अॅक्शन पाहून सर्वांनी कोहली… कोहली असा जय घोष सुरु केला. त्यामुळे तो आणखी चिडला. आता या वादामध्ये रौफच्या पत्नीने एण्ट्री मारली आहे.
हारिस रौफची पत्नी नेमकं काय म्हणाली?
हारिस रौफची पत्नी मुझना मसूद मलिकने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये हारिस रौफ हातवारे करताना दिसत आहे. तसेच त्याने या फोटोवर आम्ही सामना हरलो, पण आम्ही युद्ध जिंकलो असे कॅप्शन दिले आहे. सध्या सोशल मीडियावर मुझना मसूद मलिकची ही पोस्ट तुफान व्हायरल होताना दिसत आहे.
Haris Rauf wife post
भारताचा 6 विकेट्सने दणदणीत विजय
21 सप्टेंबर रोजी झालेल्या भारतविरुद्धच्या सुपर 4 सामन्यात हरिस रौफच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर त्याने 4 षटकांत 26 धावा देत 2 बळी घेतले. तो पाकिस्तानचा सर्वात किफायतशीर आणि सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला होता. मात्र, भारताने 7 चेंडू शिल्लक असताना 6 गडी राखून सामना जिंकला. त्यामुळे त्याच्या कामगिरीवर पाणी फिरलं. विजयानंतर संपूर्ण देशात आनंदाचे वातावरण होते.