मुंबईत राहतोय तर मराठी..; संपूर्ण महाराष्ट्राचं मन जिंकणारा रोहित शर्माचा व्हिडीओ पाहिलात का?

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने अभिनेत्री नम्रता संभेराव आणि 'थेट तुमच्या घरातून'च्या टीमसोबत अस्खलित मराठीत संवाद साधला. "मुंबईत राहतो तर मराठी येणारच" असं म्हणत त्याने पुन्हा एकदा चाहत्यांची मनं जिंकली आहेत.

मुंबईत राहतोय तर मराठी..; संपूर्ण महाराष्ट्राचं मन जिंकणारा रोहित शर्माचा व्हिडीओ पाहिलात का?
rohit sharma
| Updated on: Feb 18, 2026 | 9:05 AM

भारतीय क्रिकेट संघाचा हिटमॅन रोहित शर्मा हा कायमच चर्चेत असतो. मैदानावर असो किंवा मैदानाबाहेर तो नेहमीच त्याच्या हटके स्टाईलने चाहत्यांची मन जिंकत असतो. रोहित शर्मा हा सध्या क्रिकेटपासून दूर आहे. मात्र नुकतंच रोहित शर्माचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील काही लोकप्रिय कलाकारांनी रोहित शर्माची भेट घेतली. या भेटीचा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे. यावेळी त्याने चक्क अस्खलित मराठीत गप्पा मारल्या.

मराठी रंगभूमीवरील गाजत असलेल्या थेट तुमच्या घरातून या नाटकातील कलाकार आणि रोहित शर्मा यांची नुकतीच भेट झाली. महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री नम्रता संभेरावने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून या भेटीचा एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेता प्रसाद खांडेकर आणि त्यांच्या नाटकातील इतर कलाकार मंडळीही दिसत आहे. यावेळी हे कलाकार रोहितसोबत मज्जा-मस्ती करताना दिसत आहेत.

व्हिडीओत नेमकं काय?

या व्हिडीओत थेट तुमच्या घरातून या नाटकाची टीम एका रेस्टॉरंटमध्ये बसल्याचे दिसत आहे. त्यावेळी अचानक रोहित शर्मा येतो आणि त्याला पाहिल्यानंतर संपूर्ण टीम थक्क होते. या व्हिडीओमध्ये नम्रता संभेराव रोहितला विचारते, कसे आहात तुम्ही? त्यावर रोहित अगदी हसतमुख चेहऱ्याने मी मजेत आहे असं उत्तर देतो. त्यापुढे नम्रता त्याला म्हणते की, तुम्ही बऱ्याचदा मराठीत बोलता, म्हणून मी तुमच्याशी मराठीत बोलले. यावर रोहितने फारच हटके उत्तर दिले. या उत्तराने त्याने मराठी माणसाची मन जिंकली आहेत.

रोहित आपल्या खास शैलीत म्हणतो, काही नाही, समजते मला! मुंबईमध्ये राहतो तर मराठी तर येणारच!, असे रोहित शर्मा म्हणाले. रोहितच्या या उत्तराने तिथल्या कलाकारांना तर आश्चर्याचा धक्का बसलाच, पण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनीही त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

दरम्यान रोहित शर्मा हा मूळचा नागपूरचा असला तरी त्याचे बालपण आणि संपूर्ण क्रिकेट कारकीर्द मुंबईतच घडली आहे. अनेकदा प्रेस कॉन्फरन्समध्ये किंवा मैदानावरील स्टम्प माईकमध्ये रोहितचे मराठी शब्द ऐकायला मिळतात. मात्र, यावेळी त्याने ज्या सहजतेने संवाद साधला, त्यावरून त्याचे आपल्या भाषेवर आणि मातीवर असलेले प्रेम पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. अभिनेत्री नम्रता संभेरावने हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये रोहितच्या साधेपणाचे आणि त्याच्या मराठी भाषेतील संवादाचे भरभरून कौतुक केले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us