दुलीप ट्रॉफी स्पर्धेत गुणांची आकडेवारी कशी ठरते? जाणून घ्या जय पराजयाचं संपूर्ण गणित
देशांतर्गत दुलीप ट्रॉफी स्पर्धेला 5 सप्टेंबरपासून सुरुवात झाली आहे. या स्पर्धेचं स्वरुप बीसीसीआयने बदललं आहे. पारंपारिक विभागीय फॉर्मेटऐवजी इंडिया ए, इंडिया बी, इंडिया सी आणि इंडिया डी असे चार संघ बांधले आहेत. अर्थातच फॉर्मेट बदलल्याने गुणतालिकेतही बदल झालेला आहे. चला सर्वकाही सविस्तर समजून घेऊयात.
आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय क्रिकेट संघाला चांगली कामगिरी करायची असेल तर त्याची पायाभरणी देशांतर्गत क्रिकेटमध्ये व्हायला हवी. याची जाणीव बीसीसीआयला असल्याने देशांतर्गत क्रिकेटला प्रोत्साहान देण्यासाठी कठोर धोरण अवलंबलं आहे. त्यामुळे दिग्गज खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळाणं भाग पडलं आहे. त्याचे परिणाम यंदाच्या दुलीप ट्रॉफी 2024 स्पर्धेत दिसून आले आहेत. शुबमन गिल, ऋषभ पंत, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर असे दिग्गज खेळाडू या स्पर्धेत उतरले आहेत. त्यामुळे क्रीडारसिकांचा या स्पर्धेकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. इतकंच काय तर बीसीसीआयने देशांतर्गत क्रिकेटसाठी मानधनही वाढवलं आहे. एकंदरीत या स्पर्धांचा कायापालट झाला असं म्हणायला हरकत नाही. बीसीसीआयने पारंपरिक विभागीय फॉर्मेट काढून टाकले आणि त्याला नवं स्वरूप देत इंडिया ए, इंडिया बी, इंडिया सी आणि इंडिया डी अशी संघांची बांधणी केली आहे. दुलीप ट्रॉफी स्पर्धेतील सामने बंगळुरु आणि अनंतपूर येथे सुरु आहेत. स्पर्धेत चार संघ असून प्रत्येक संघ तीन सामने खेळणार आहे. या स्पर्धेत इंडिया ए संघाची धुरा शुबमन गिलकडे, इंडिया बी संघाची धुरा अभिमन्यू ईश्वरनकडे, इंडिया सी संघाची धुरा ऋतुराज गायकवाडच्या खांद्यावर, तर इंडिया डी संघाची धुरा श्रेयस अय्यरकडे सोपवण्यात आली आहे. जसं या फॉर्मेटचं स्वरुप बदललं आहे. तसेच जय पराजय आणि गुणतालिकेचं गणितही बदललं आहे.
दुलीप ट्रॉफी स्पर्धेत उपांत्य फेरी, अंतिम फेरी असा प्रकार नाही. साध्या शब्दात सांगायचं तर बाद फेरीचे सामने नाहीत. गुणातिकेतील आकडेवारीच्या आधारावरच विजेता ठरवला जाणार आहे. म्हणजेच गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेला संघ विजेता घोषित केला जाईल. मग आता सामन्यांचे गुण कसे दिले जातील हा प्रश्न पडला असेल. तर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला पुढे मिळेल.
अशी आहे गुणतालिकेतील आकडेमोड
- संघ एक डाव आणि 10 विकेटने जिंकला तर 7 गुण दिले जातील.
- दुसऱ्या डावात विजय मिळवला तर 6 गुण मिळतील.
- सामना अनिर्णित राहिला पण पहिल्या डावात आघाडी असेल तर 3 गुण मिळतील.
- सामना अनिर्णित राहिला पण पहिल्या डावात पिछाडीवर असलेल्या संघाला 1 गुण मिळेल.
इंडिया सी आणि इंडिया डी संघातील निकालावरून जाणून घ्या आकडेवारी
इंडिया सी आणि इंडिया डी सामन्याचा निकाल तिसऱ्या दिवशीच लागला. इंडिया सी संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. तसेच श्रेयस अय्यरच्या नेतृत्वातील डी संघाला पहिल्या डावात 164 धावांवर रोखलं. पहिल्या डावातील या धावांचा पाठलाग करताना ऋतुराजच्या संघाने 168 धावा केल्या आणि 4 धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात श्रेयस अय्यरच्या संघाने सर्वबाद 236 धावा केल्या आणि 4 धावांची आघाडी वजा करत विजयासाठी 232 धावा दिल्या. हे आव्हान ऋतुराजच्या संघाने तिसऱ्या दिवशी 6 गडी गमवून पूर्ण केलं. या विजयासह ऋतुराजच्या नेतृत्वातील सी संघाला 6 गुण मिळाले. तर श्रेयस अय्यरच्या डी संघाच्या खात्यात शून्य गुण आहेत.
दुसरीकडे, इंडिया ए आणि इंडिया बी सामन्याचं गणित वेगळं आहे. कारण या सामन्याचा निकाल अजून लागलेला नाही. या सामन्याचा खेळ चौथ्या म्हणजेच शेवटच्या दिवसापर्यंत गेला आहे. पहिल्या डावात इंडिया बी संघाने 321 धावा केल्या. तर इंडिया ए संघाला 231 धावा करता आल्या. त्यामुळे बी संघाकडे 90 धावांची आघाडी आली. तसेच बी संघाने 6 गडी गमवून दुसऱ्या डावात 150 धावा करत 240 धावांपर्यंत मजल मारली आहे. तसेच पुढे खेळ सुरु आहे. त्यामुळे चौथ्या दिवशी दोन्ही संघापैकी एकाने विजय मिळवला तर 6 गुण मिळतील. पण हा सामना अनिर्णित राहिला तर इंडिया बी संघाला 3 आणि इंडिया ए संघाला 1 गुण मिळेल. कारण पहिल्या डावात बी संघाकडे 90 धावांची आघाडी आहे.
दुलीप ट्रॉफी 2024 स्पर्धेतील चार संघांचे खेळाडू
इंडिया ए: शुबमन गिल (कर्णधार), मयंक अग्रवाल, केएल राहुल, टिळक वर्मा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), शिवम दुबे, रियान पराग, तनुष कोटियन, कुलदीप यादव, आकाश दीप, खलील अहमद, आवेश खान, विद्वत कवेरप्पा, कुमार कुशाग्र, शाश्वत रावत.
इंडिया बी: अभिमन्यू ईश्वरन (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, सरफराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), मुशीर खान, नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, नवदीप सैनी, यश दयाल, राहुल चहर, मुकेश कुमार, रविश्रीनिवासन साई किशोर, मोहित अवस्थी, एन जगदीसन.
इंडिया सी: ऋतुराज गायकवाड (कर्णधार), साई सुदर्शन, रजत पाटीदार, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), बाबा इंद्रजीथ, हृतिक शोकीन, मानव सुथार, गौरव यादव, विजयकुमार विषक, अंशुल कंबोज, मयंक मार्कंडे, हिमांशू चौहान, संदीप वारकरी जुयाल.
इंडिया डी: देवदत्त पडिक्कल, अथर्व तायडे, श्रेयस अय्यर (कर्णधार), यश दुबे, रिकी भुई, श्रीकर भारत (विकेटकीपर), अक्षर पटेल, सरांश जैन, तुषार देशपांडे, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, आकाश सेनगुप्ता, आदित्य ठाकरे, इशान किशन, सौरभ कुमार, संजू सॅमसन
दुलीप ट्रॉफी 2024 स्पर्धेचं वेळापत्रक
- इंडिया ए विरुद्ध इंडिया बी (5 सप्टेंबर)
- इंडिया सी विरुद्ध इंडिया डी (5 सप्टेंबर)
- इंडिया ए विरुद्ध इंडिया डी (12 सप्टेंबर)
- इंडिया बी विरुद्ध इंडिया सी (12 सप्टेंबर)
- इंडिया ए विरुद्ध इंडिया सी (19 सप्टेंबर)
- इंडिया बी विरुद्ध इंडिया डी (19 सप्टेंबर)
19 सप्टेंबरपासून भारत आणि बांग्लादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. त्यामुळे दुलीप ट्रॉफीच्या दुसऱ्या सामन्यात निवड झालेले दिग्गज खेळाडू खेळणार नाहीत हे जवळपास स्पष्ट आहे. यात शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, कुलदीप यादव, अक्षर पटेल या खेळाडूंचा समावेश असू शकतो. कारण 12 सप्टेंबरपूर्वी बांगलादेशविरुद्ध टीम इंडियाची घोषणा केली जाईल. तसेच गौतम गंभीरच्या प्रशिक्षणाखाली 12 सप्टेंबरपासून चेन्नईच्या चेपॉक मैदानात सराव सुरु होणार आहे. बांगलादेशविरुद्धचा कसोटी सामना भारतासाठी खूपच महत्त्वाचा आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीचं गणित या मालिकेवर अवलंबून आहे.
दुलीप ट्रॉफी स्पर्धेचा इतिहास
दुलीप ट्रॉफी स्पर्धेला बीसीसीआयने 1961-62 मध्ये सुरुवात केली होती. तेव्हा संघांची विभागणी नॉर्थ, साउथ, ईस्ट, वेस्ट आणि सेंट्रल अशी होती. नॉर्थ झोनमध्ये चंदीगड, दिल्ली, हरयाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, पंजाब हा भाग होता. तर साउथ झोनमध्ये आंध्र प्रदेश, गोवा, हैदराबाद, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू हा भाग होता. सेंट्रल झोनमध्ये छत्तीसगड, मध्य प्रदेश, रेल्वे, राजस्थान, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि विदर्भ हा भाग होता. ईस्ट झोनमध्ये आसाम, बिहार, बंगाल, झारखंड, ओडिशा आणि त्रिपुरा हा भाग होता. नॉर्थ ईस्ट विभागात अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय,मिझोरम, नागालँड आणि सिक्कीम हा भाग होता. तर वेस्ट झोनमध्ये बरोडा,गुजरात, महाराष्ट्र, मुंबई आणि सौराष्ट हा भाग होता.
2016 या वर्षी बीसीसीआयने या संघांची बांधणी इंडिया रेड, इंडिया ब्ल्यू आणि इंडिया ग्रीन अशी केली होती. पण 2022-23 पासून पुन्हा एकदा विभागवार संघ जाहीर केले. पण या वर्षापासून इंडिया ए, इंडिया बी, इंडिया सी आणि इंडिया डी असं नामकरण केलं आहे. दुलीप ट्रॉफी स्पर्धेचं हे 61 वं पर्व सुरु आहे. आतापर्यंतचा इतिहास पाहिला तर वेस्ट झोनचा सर्वाधिक पगडा या स्पर्धेवर दिसला आहे. 19 वेळा वेस्ट झोन संघाने विजय मिळवला आहे.