भारत-बांग्लादेश सामन्यात लोगोतून गायब पाकिस्तानचे नाव, आता पुढील सामन्यात असेच होणार? ICC म्हणाले काय?

ICC Champions Trophy 2025 Logo : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये आतापर्यंत दोन मोठे सामने रंगले. भारत-बांगलादेशातील सामन्या दरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफीच्या लोगोतून पाकिस्तानचे नावच गायब झाल्याने एकच गदारोळ सुरू झाला आहे. काय आहे हे प्रकरण?

भारत-बांग्लादेश सामन्यात लोगोतून गायब पाकिस्तानचे नाव, आता पुढील सामन्यात असेच होणार? ICC म्हणाले काय?
यजमानालाच दणका
| Updated on: Feb 21, 2025 | 10:08 AM

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये यजमान पाकिस्तानला अनेकदा नामुष्कीची वेळ आली आहे. भारताविना ही स्पर्धा घेण्याच्या या शेजारी देशाच्या मनसुब्यावर पाणी अगोदरच फेरले गेले. भारताच्या अटी-शर्तीवरच टुर्नामेंट सुरू असल्याने हे राष्ट्र अगोदरच खजील झाले आहे. त्यातच आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या लाईव्ह प्रक्षेपण सुरू असताना या यजमान देशाचे नाव लोगोतून गायब झाले. भारत-बांग्लादेश सामन्या दरम्यान हा प्रकार घडला. यापूर्वी न्युझीलंडसोबत पाकिस्तानचा सामना झाला, त्यावेळी असे घडले नव्हते. त्यावेळी लोगोत पाकिस्तानचे नाव होते. एकाच टुर्नामेंटच्या दोन सामन्यातील हा फरक लागलीच प्रेक्षकांनी टिपला. त्यावरून पाकिस्तानमध्ये एकच खळबळ उडाली. भारतीय सामन्यावेळीच नेमके लोगोतून पाकिस्तानचे नाव कसे गायब झाले, यावर आता खल सुरू आहे. आता पाकिस्तान-भारत सामन्यातही असेच होणार का? ICC ची भूमिका काय असे प्रश्न अनेक क्रिकेट चाहते विचारत आहेत.

लोगोत नाही नाव, ICC म्हटलं काय?

भारत आणि बांग्लादेश या देशाच्या सामन्या दरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफीच्या लोगोसह पाकिस्तानचे नाव दिसले नाही. आता यावर ICC ने स्पष्टीकरण दिले आहे. क्रिकेटच्या या सर्वोच्च संघटनेने यामागे तांत्रिक कारण पुढे केले आहे. तांत्रिक कारणामुळे या सामन्या दरम्यान लोगोतून पाकिस्तानचे नाव गायब झाल्याचे कारण पुढे करण्यात आले आहे. हा ग्राफिक्स संबंधीची अडचण असल्याचे सांगण्यात येत आहे. पण संपूर्ण सामन्यात हा प्रकार दिसल्याने पाकिस्तानचा जळफळाट झाला आहे. तर यापुढे दुबईत होणाऱ्या सामन्यात चॅम्पियन्स ट्रॉफीच्या लोगोसह पाकिस्तानचे नाव झळकणार असे स्पष्टीकरण संघटनेने दिले आहे. जी चूक झाली ती लवकर दुरूस्त करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

यजमानाला संताप, कधी लोगो, तर कधी जर्सीवर नाही नाव

यजमान देशाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची जबाबदारी उचलली आहे. सध्या या देशाला भीकेचे डोहाळे लागले असले तरी त्यांनी या स्पर्धेचे चांगले आयोजन केले आहे. पण भारताने दहशतवादाच्या, घुसखोरीच्या मुद्दावरून, सुरक्षेच्या कारणावरून पाकिस्तानमध्ये सामना खेळण्यास नकार दिला होता. यापूर्वी भारतीय जर्सीवर आयोजक पाकिस्तानचे नाव नसल्याने एकच खळबळ उडाली होती. पण त्यानंतर हा वाद शमला. तर दुसरीकडे आता भारत-बांगलादेशाच्या सामन्यात लोगोतून नाव गायब झाल्याने पाकिस्तानचा जळफळाट झाला आहे.