‘हा’ भारतीय खेळाडू ठरला ‘आयसीसी’चा सर्वोत्तम वनडे क्रिकेटपटू

| Updated on: Jan 15, 2020 | 12:52 PM

यंदाच्या वर्षात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या क्रिकेटपटूंचा गौरव करण्यासाठी आयसीसीने बुधवारी पुरस्कारांची घोषणा केली

हा भारतीय खेळाडू ठरला आयसीसीचा सर्वोत्तम वनडे क्रिकेटपटू
Follow us on

मुंबई : 2019 मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा टीम इंडियाचा ‘हिटमॅन’ रोहित शर्माचा ‘आयसीसी’कडून गौरव करण्यात आला आहे. रोहितला या वर्षाचा सर्वोत्कृष्ट वनडे क्रिकेटपटू (ICC ODI Cricketer Of The Year) म्हणून गौरवण्यात येणार आहे. तर कर्णधार विराट कोहलीला ‘स्पिरीट ऑफ क्रिकेट’ किताब बहाल करण्यात येणार आहे.

रोहित शर्माने गेल्या वर्षी एकूण सात शतकं ठोकली होती, त्यापैकी पाच शतकं ही इंग्लंडमधील विश्वचषकात झळकवण्यात आली होती.

विराट कोहली स्पिरिट ऑफ क्रिकेट पुरस्काराचा मानकरी ठरला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लीग सामन्यादरम्यान विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथचं मनोधैर्य उंचावण्यासाठी प्रेक्षकांना चीअर करायला सांगितलं होतं. विराटच्या खिलाडूवृत्तीची आयसीसीने दखल घेतली आहे.

सहा विकेट्सच्या मोबदल्यात सात धावा या जादूई आकड्याबद्दल दीपक चहरला सर्वोत्तम टी-20 परफॉर्मन्स पुरस्कार देण्यात येणार आहे.

ऑस्ट्रेलियाचा मार्नस लॅबुशेन हा ‘सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख क्रिकेटपटू’ या पुरस्काराने सन्मानित झाला आहे. वर्षभरातील 11 कसोटी सामन्यांत त्याने 1 हजार 104 धावा केल्या.

इंग्लंडच्या विश्वचषक विजयात मुख्य भूमिका बजावणाऱ्या बेन स्टोक्सला जगातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूची ‘सर गारफिल्ड सोबर्स ट्रॉफी’ प्रदान करण्यात येत आहे.

मागील मोसमात कसोटी क्रिकेटमध्ये 59 विकेट्स घेणाऱ्या पॅट कमिन्सला आयसीसीने सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटू (ICC ODI Cricketer Of The Year) म्हणून निवडले आहे. इंग्लंडचे माजी कसोटीपटू रिचर्ड इलिंगवर्थ हे आयसीसीचे सर्वोत्तम अम्पायर ठरले आहेत.