Sanju Samson : “संजू सॅमसनला संधी मिळाली असती, तर त्याने 2019 चा वर्ल्ड कप जिंकून दिला असता”

| Updated on: Sep 30, 2020 | 5:00 PM

संजूचं आयपीएलच्या 13 व्या मोसमातील खेळीसाठी कौतुक केलं जातंय.| ( Shanthakumaran Sreesanth On Sanju Samson )

Sanju Samson : संजू सॅमसनला संधी मिळाली असती, तर त्याने 2019 चा वर्ल्ड कप जिंकून दिला असता
Follow us on

नवी दिल्ली : आयपीएल  (IPL 2020) स्पर्धेत राजस्थान रॉयल्सचा संजू सॅमसन (Sanju Samson) दमदार फलंदाजी करतोय. संजूच्या कामगिरीवर अनेक आजीमाजी क्रिकेटपटू आनंदी आहेत. संजूचं आयपीएलच्या 13 व्या मोसमातील खेळीसाठी कौतुक केलं जातंय.  संजू सॅमसनला संधी मिळाली असती, तर त्याने 2019 चा वर्ल्ड कप जिंकून दिला असता, अशी प्रतिक्रिया भारताचा खेळाडू एस श्रीसंतने (Shanthakumaran Sreesanth) दिली आहे.  एस श्रीसंतने शशी थरुर यांच्या ट्विटला प्रत्युतर देताना ही प्रतिक्रिया दिली आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेस खासदार शशी थरुर यांनी संजूच्या खेळीचं ट्विटद्वारे कौतुक केलं होतं. (Shanthakumaran Sreesanth On Sanju Samson)

श्रीसंत काय म्हणाला ?

“श्रीसंतने शशी थरुर यांनी केलेल्या ट्विटवर प्रतिक्रिया दिली आहे. “संजू भविष्यातला धोनीवगैरे नाही. संजू हा एकमेवादित्य आहे. त्यातील प्रतिभा पाहता संजूच्या आतंरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीची 2015 पासून सुरुवात व्हायला हवी होती. त्याने क्रिकेटच्या तीन्ही प्रकारात खेळायला हवं होतं. कृपया करुन त्याची कोणासोबत तुलना करु नये. संजूला जर योग्य वेळेस संघात स्थान दिलं असतं, तर त्याने 2019 चा वर्ल्ड कप भारताला जिंकवून दिला असता”, अशी प्रतिक्रिया श्रीसंतने शशी थरुर यांच्या ट्विटवर दिली आहे.

शशी थरुर काय म्हणाले ?

“राजस्थानने पंजाब विरुद्ध मिळवलेला विजय हा चित्तथरारक होता. मी संजू सॅमसनला मागील 10 वर्षांपासून ओळखतो. एकेदिवशी तु भविष्यातील महेंद्रसिंह धोनी बनणार, असं मी संजूला त्याच्या वयाच्या 14 व्या वर्षी सांगितलं होतं. आज तो दिवस उजाडला आहे. आयपीएलच्या यंदाच्या मोसमात दोन सामन्यात संजूने दमदार खेळी केली. यानंतर संजू विश्वविख्यात खेळाडू म्हणून नावारुपाला आला आहे”, असं शशी थरुर (Shashi Tharoor) यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

गौतम गंभीरचे प्रत्युतर

शशी थरुर यांनी केलेल्या ट्विटला गौतम गंभीरने (Gautam Gambhir) प्रत्युतर दिलं. शशी थरुर यांचे ट्विट शेअर करत गंभीर म्हणाला की, “संजूला कोणासारखं बनण्याची गरज नाही, संजूने त्याचं स्वत:च अस्तित्व सिद्ध केलं आहे. संजू क्रिकेटमधील ‘द संजू सॅमसन’ राहिल” असं गंभीर म्हणाला.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच श्रीसंतला मोठा दिलासा मिळाला आहे. श्रीसंतवर आयपीएल 2013 च्या स्पॉट फिक्सिंगप्रकरणी बंदी घालण्यात आली होती. ही बंदी बीसीसीआयने उठवली आहे. त्यामुळे श्रीसंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे.

संबंधित बातम्या :

संजू सॅमसन पुढचा धोनी, शशी थरुर यांच्याकडून कौतुक, गौतम गंभीर भडकला

मी कुठेही क्रिकेट खेळण्यास तयार, मला बोलवा : एस श्रीसंत

( Shanthakumaran Sreesanth On Sanju Samson )