
सध्या न्यूझीलंड विरुद्ध वनडे सीरीज सुरु आहे. टीम इंडियाने पहिली वनडे जिंकली. अजून दोन सामने बाकी आहेत. पहिल्या वनडेमध्ये टीम इंडियाचा ऑलराऊंडर वॉशिंग्टन सुंदरला दुखापत झाली. त्याच्याजागी आयुष बदोनीची टीममध्ये निवड झाली आहे. आता या निवडीवरुन वेगवेगळी मत व्यक्त होत आहेत. सुंदर फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये उपयुक्त आहे, या एकाच कारणासाठी त्याची टीमममध्ये निवड करत नाहीत, तर तो एक लेफ्टी बॅट्समन आहे. ऑफ स्पिन गोलंदाजीची क्षमता आणि मधल्या फळीत गरजेनुसार फलंदाजी ही कारणं सुंदर यांच्या निवडीमागे आहेत. आता त्याच्याजागी दुसऱ्या खेळाडूची निवड करायची असेल, तर त्या खेळाडूमध्ये सुद्धा असेच गुण शोधण्याचा प्रयत्न होणार. म्हणून वॉशिंग्टन सुंदरच्या जागी आयुष बदोनी फिट आहे का? नितीश कुमार रेड्डी सुद्धा चांगला पर्याय होता, अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.
आयुष बदोनीचा दोन गोष्टींमध्ये फायदा आहे, म्हणून त्याची सुंदरच्या जागी न्यूझीलंड विरुद्ध उर्वरित दोन वनडेसाठी टीममध्ये निवड झालीय. मधल्या फळीत वेगाने धावा बनवण्याची क्षमता आणि ऑफ-ब्रेक गोलंदाजी. समोर लेफ्टी बॅट्समन असेल, तर त्याची ऑफ-ब्रेक गोलंदाजी उपयुक्त ठरु शकते. संघाची जी गरज आहे, त्यामध्ये तो फिट बसतो. एखाद्याची रिप्लेसमेंट म्हणजे रिलायबलिटी म्हणजे विश्वासाने अवलंबून राहणं. समानता किंवा तसाच मिळताजुळता असा विचार त्यामागे असतो. सुंदर वनडेमध्ये 10 ओव्हर टाकू शकतो. पण वनडेमध्ये बदोनी 10 ओव्हर गोलंदाजी करु शकतो का? या बद्दल साशंकता आहे. टी 20 मध्ये चार ओव्हर गोलंदाजी एक वेगळी बाब आहे.
टीममध्ये संतुलन चांगलं कोण ठेऊ शकतो?
सुंदरच्या जागी नितीश कुमार रेड्डी सुद्धा एक चांगला पर्याय ठरला असता. रेड्डी एक ऑलराऊंडर आहे. फलंदाजीत तो योगदान देऊ शकतो. वेगवान गोलंदाजी करु शकतो. प्लेइंग इलेव्हनमध्ये भारताला दोन स्पेशलिस्ट स्पिनर आणि सहावा गोलंदाजीचा पर्याय हवा असेल, तर पार्ट टाइम गोलंदाजापेक्षा रेड्डी चांगला पर्याय आहे. मधल्या षटकात आणि डेथ ओव्हर्समध्ये नितीश कुमार रेड्डी उत्तम गोलंदाज आहे. सुंदरच्या अनुपस्थितीत टीममध्ये संतुलन चांगलं कोण ठेऊ शकतो? या प्रश्नाचं उत्तर आहे नितीश कुमार रेड्डी.