
येत्या काही दिवसांतच आयपीएलचा 19 वा सीझन सुरू होणार असून पुढील 2 महिने 10 संघांची रणधुमाळी पहायला मिळणार आहे. आयपीएल 2026 च्या ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी सगळ्याच टीम उत्सुक आहेत. मात्र आयपीएलचा हा सीझन सुरू होण्यापूर्वीच प्रत्येक टीममध्ये काही ना काही बदल केले आहेत, मग ते स्क्वॉडमधले असोत किंवा कोचिंग स्टाफमधले. तर राजस्थना रॉयल्सने त्यांचा कर्णधारही बदलला आहे. मात्र याच दरम्यान कोलकाता नाईट रायजर्स अर्थात केकेआर टीमच्या कर्णधारपदात बदल होण्याच्याही अनेक अटकळी व्यक्त होत असून त्याबद्दल अनेक अफवा सतत उडत असतात. आता आयपीएलची स्पर्धा सुरू होण्याच्या दोन आठवडे आधीच अचानक KKR चा कॅप्टन अजिकंय रहाणे हा पदावरून हटल्याचा दावा करण्यात येत आहे. आणि त्यासाठी कारणीभूत ठरली आहे ती एक सोशल मीडिया पोस्ट, ज्यावर रहाणेने कॅप्टन्सी सोडल्याची घोषणा केली आहे.
रहाणेचा राजीनामा व्हायरल
‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील एका अकाउंटवरून अजिंक्य रहाणे याच्या नावाने एक निवेदन पोस्ट करण्यात आलं आहे. ते त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून घेतलेलं दिसतंय. “कोलकाता नाईट रायडर्सचे नेतृत्व करणे आणि सामने जिंकणे हा सन्मान आहे. नवीन हंगाम जवळ येत असताना, नवीन कर्णधार तयार करण्याची ही योग्य वेळ आहे असं मला वाटतं. म्हणूनच मी कर्णधारपद न सांभाळण्याचा निर्णय घेतला आहे.” असं त्यात म्हटलं आहे.
Thank you 🙏🏻 pic.twitter.com/kcpfUZLA5Y
— Ajinkya Bahane (@OnlyGGmatters) March 12, 2026
त्या निवेदनासोबत 12 मार्च 2026 ही तारीखही लिहीण्यात आली असून यामुळे सोशल मीडियावरील युजर्ससकट सगळेच हैराण झाले. केकेआरच्या कॅप्टन्सीमध्ये खरंच बदल झाला आहे का? रहाणेने राजीनामा दिलाय ? हे निवेदन खरं आहे का? असे प्रश्न अनेकांच्या मनात आहेत. पण हे अजिबात खरं नाहीये. रहाणे किंवा केकेआरकडून अशी कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. अजिंक्य रहाणेच्या सर्व सोशल मीडिया अकाऊंट्सची तपासणी केल्यावर तेव्हा सत्य समोर आलं. रहाणेने कॅप्टन्सी सोडलेली नाही आणि अशी कोणतीही घोषणा देखील त्याने केलेली नाही.
व्हायरल पोस्टचं सत्य काय ?
म्हणजेच रहाणेने कर्णधारपदाचा राजीनामा देण्याबद्दल केलेलं विधान पूर्णपणे खोटं आहे. या विधानामागची खरी गोष्ट म्हणजे, रहाणेने गेल्या वर्षीही अशीच घोषणा केली होती, परंतु ती आयपीएल कर्णधारपदाचा राजीनामा देण्याबाबत नवह्ती तर स्थानिक क्रिकेटमधील मुंबई संघाच राजीनामा देण्याबाबतची ती घोषणा होती. रहाणेच्या पोस्टची भाषा आणि आजच्या या बनावट पोस्टमधील भाषा सारखीच आहे. मात्र त्याचं मूळ विधान जे होते, तेच फक्त एडिट केलंय. आणि मुंबईच नाव बदलून तिथे कोलकाता नाईट रायडर्सचं नाव टाकलं आहे.
Captaining and winning championships with the Mumbai team has been an absolute honour.
With a new domestic season ahead, I believe it’s the right time to groom a new leader, and hence I’ve decided not to continue in the captaincy role.
I remain fully committed to giving my best…
— Ajinkya Rahane (@ajinkyarahane88) August 21, 2025
KKR च्या कर्णधारपदी रहाणे कायम
2024 चा विजेता कर्णधार श्रेयस अय्यर पंजाब किंग्जसोबत मेगा लिलावात सहभागी झाला, त्यानंतर अजिंक्य रहाणेला गेल्या हंगामात केकेआर संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले. मात्रे रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या केकेआरला गेल्या हंगामात फार यश मिळाले नाही. हा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरला नाही. तरीही, हंगामातदेखील रहाणे हाच केकेआरचं नेतृत्व करणार आहे. केकेआरचा पहिला सामना 29 मार्च रोजी वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सविरुद्ध होणार आहे.