
Shreyas Iyer : बीसीसीआयने नुकेच आशिया चषक 2025 साठी 15 खेळाडूंच्या भारतीय संघाची घोषणा केली. यावेळी संघनिवड करताना निवड समितीने अनेक अचंबित करणारे निर्णय घेतले आहेत. अक्षर पटेलजवळ असलेले उपकर्णधारपद शुभमन गिलला देण्यात आले आहे. तर भारताचा स्टार खेळाडू म्हणून ओळख असलेल्या श्रेयस अय्यरला तर संघातच स्थान देण्यात आलेले नाही. बीसीसीआयच्या याच निर्णयामुळे क्रिकेट रसिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, आता भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवलेल्या के. श्रीकांत यांनी बीसीसीआयीची निवड समिती आणि या समितीचे प्रमुख अजित आगरकर यांच्यावर सडकून टीका केली आहे. हा सगळा मुर्खपणा आहे, असं त्यांनी म्हटलंय.
श्रेयस अय्यरने 2025 सालच्या आयपीएलमध्ये 170 च्या स्ट्राईक रेटने तब्बल 600 धावा केल्या होत्या. मात्र तरीदेखील त्याला संघात स्थान देण्यात आलेले नाही. यावरच श्रीकांत यांनी नाराजी व्यक्त केली. बीसीसीआयच्या निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांना श्रीकांत यांनी लक्ष्य केलं आहे. श्रेयसला संघाच्या बाहेर ठेवण्याचा निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे, असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं.
“श्रेयस अय्यरचा फॉर्म पाहता त्याला संघात स्थान द्यायला हवे होते. संघनिवड करताना खेळाडूची नुकत्याच झालेल्या सामन्यांत कशी कामगिरी आहे, हे पाहिले पाहिजे. एका वर्षापूर्वीचा खेळ लक्षात घेऊन खेळाडूंची निवड केल्यास, त्याला काहीही अर्थ उरणार नाही. श्रेयसने आयपीएलमध्ये 175 च्या स्ट्राईक रेटने 600 धावा केल्या आहेत. ही फार महत्त्वपूर्ण बा आहे. श्रेयस चांगला खेळाडू आहे. तरीदेखील त्याला संघाच्या बाहेर ठेवण्यात आले,” असे मत श्रीकांत यांनी व्यक्त केले. तसेच श्रेयसला कोणत्या खेळाडूच्या जागेवर घ्यायला हवे होते? असा प्रतिप्रश्न निवड समिती करत आहे. आगरकर यांचे हे मुर्खपणाचे विधान आहे, अशी थेट टीकाही त्यांनी केली.
आशिया चषक 2025 साठी संघनिवड करताना अजित आगरकर यांनी श्रेयस अय्यरच्या निवडीबाबत भाष्य केले होते. माझ्यापुढे बरेच खेळाडू आहेत. पण मला फक्त 15 खेळाडूंची निवड करावी लागणार आहे. श्रेयस अय्यरला कोणत्या अन्य खेळाडूच्या जागेवर घेता येईल. श्रेयस कोणाची जागा घेऊ शकतो? यात आमचा काहीच दोष नाही, असे अजित आगरकर म्हणाले होते.