Virat Kohli: तो स्वत: एक आजोबा आहे, त्याला नक्कीच पश्चाताप होईल…कपिल देव कोहलीबद्दल असं का म्हणाले?
Kapil Dev On Virat Kohli: माजी दिग्गज क्रिकेटपटू कपिल देव यांनी नुकतेच विराट कोहलीबद्दल एक विधान केले आहे ज्याची खूप जास्त चर्चा होत आहे.

विराट कोहली सध्या फक्त वनडे क्रिकेटच खेळत आहे. त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आता कोहली फक्त वनडे क्रिकेट खेळत असूनही तो मैदान गाजवत आहे. आता विराट कोहलीने घेतलेल्या एका निर्णयावर माजी दिग्गज क्रिकेटपटू कपिल देव यांनी टीका केली आहे.
भारतीय क्रिकेटचे दिग्गज कपिल देव म्हणाले की, “विराट कोहलीने अधिक कसोटी क्रिकेट खेळायला हवे होते आणि त्याच्या फलंदाजीचा चाहता म्हणून, त्याच्या या निर्णयामुळे त्यांना दुःख झाले आहे. कोहलीने पुढील दोन ते तीन वर्षे एकदिवसीय क्रिकेट खेळत राहावे आणि सर्व विक्रम मोडावेत. कपिल देव म्हणाले, “ज्याप्रकारे तो खेळत आहे, तो फिट दिसतोय. या वयात तंदुरुस्ती खूप महत्त्वाची आहे. आणि जर तो पुढील दोन ते तीन वर्षे तंदुरुस्त राहू शकला, तर मला वाटते की तो सर्व विक्रम मोडू शकतो. आणि दुसरे म्हणजे, मला त्याच्याबद्दल वाईट वाटते. त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. मला माहीत नाही त्याने हा निर्णय का घेतला आगे,” असे कपिल यांनी पीटीआयला सांगितले.
“कधी थांबायचे, कधी खेळायचे हे त्याला चांगलेच माहीत आहे. पण एक प्रेक्षक म्हणून, एक माजी क्रिकेटपटू म्हणून, मला वाटते की त्याने अधिक कसोटी क्रिकेट खेळायला हवे होते कारण त्याच्यात क्षमता आहे. आज त्याला वाईट वाटत असेल की नाही हे मला माहीत नाही,” असेही ते पुढे म्हणाले.
कपिलने दावा केला की, काही वर्षांत कोहलीला त्याच्या निर्णयाचा पश्चात्ताप होईल आणि त्याला वाटेल की त्याने आणखी काही वर्षे खेळायला हवे होते. पण त्याला स्वतःलाच सर्वोत्तम काय आहे ते माहिती असते आणि लोकांनी त्याला त्याचा निर्णय बदलायला सांगायला पण नाही पाहिजे. मला वाटते की तो ३७ किंवा ३८ वर्षांचा आहे. तो क्रिकेटमधील आजोबांसारखा आहे. त्यामुळे आमच्यासारख्या लोकांनी त्याला सल्ला देणे योग्य नाही. त्याच्यासाठी काय योग्य आहे हे त्याला माहीत आहे. बस्स. एक बाहेरचा माणूस म्हणून मला असे वाटते. तो आणखी काही काळ खेळायला हवा होता. त्याने निवृत्तीतून बाहेर यायला हवे होते.”