Lasith Malinga | 4 चेंडूत 4 विकेट्स, तिन्ही फॉर्मेटमध्ये शंभर बळी टिपणारा मलिंगा एकमेव गोलंदाज

| Updated on: Sep 07, 2019 | 11:17 AM

न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्याच्या तिसऱ्याच षटकात मलिंगाने चार चेंडूंमध्ये चार फलंदाजांना माघारी धाडलं. त्याने मुनरोपाठोपाठ हेमिश रदरफोर्ड, कॉलिन डी ग्रँडहोम आणि रॉस टेलर यांना बाद केलं.

Lasith Malinga | 4 चेंडूत 4 विकेट्स, तिन्ही फॉर्मेटमध्ये शंभर बळी टिपणारा मलिंगा एकमेव गोलंदाज
Follow us on

कोलंबो : श्रीलंकेचा जलदगती गोलंदाज (Sri Lanka Yorker King) लसिथ मलिंगा (Lasith Malinga) याने विक्रमांचा अक्षरशः पाऊस पाडला. क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये (कसोटी, वनडे आणि टी20) शंभरपेक्षा अधिक विकेट्स घेणारा तो जगातील पहिलाच गोलंदाज ठरला आहे. दुसऱ्यांदा सलग चार चेंडूंमध्ये चार विकेट्स (Lasith Malinga Hattrick) घेऊन त्याने शिरपेचात मानाचा तुरा रोवला.

मलिंगा शुक्रवारी आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 100 विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज ठरला. न्यूझीलडविरुद्ध सुरु असलेल्या टी20 मालिकेच्या तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात त्याने कॉलिन मुनरोची विकेट घेत हा बहुमान पटकावला. 76 सामन्यांमध्ये शंभर बळी टिपण्याचा पराक्रम त्याने केला.

याआधी पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीच्या नावे सर्वाधिक (97) विकेट्सचा विक्रम होता. मात्र रविवारच्या सामन्यातच मलिंगाने हा विक्रम मोडित काढला होता. आता शंभरचा आकडा त्याने गाठला आहे.

चार चेंडूत चार विकेट

श्रीलंकेने ठेवलेल्या 126 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी न्यूझीलंड संघ मैदानात उतरला. मात्र तिसऱ्याच षटकात मलिंगाने चार चेंडूंमध्ये चार फलंदाजांना माघारी धाडण्याची अनोखी कामगिरी बजावली. मलिंगाने मुनरोपाठोपाठ हेमिश रदरफोर्ड, कॉलिन डी ग्रँडहोम आणि रॉस टेलर यांना बाद केलं. त्यामुळे किवींचं धाबं दणाणलं.

तिसऱ्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर मुनरो (12), तर चौथ्यावर हेमिश रदरफोर्ड भोपळाही न फोडता तंबूत परतला. कॉलिन डी ग्रँडहोमची ‘पॅव्हेलियन’वापसी करत मलिंगाने आपली हॅट्ट्रिक साधली. मात्र इतक्यावर त्याचं समाधान न झाल्याने षटकातील शेवटच्या चेंडूवर त्याने टेलरला माघारी धाडलं. त्यामुळे न्यूझीलंडची अवस्था चार बाद 15 अशी केविलवाणी झाली. अखेर, 16 षटकात 88 धावांवरच न्यूझीलंड गारद झाली.

मलिंगाने या सामन्यात केवळ सहा धावा देत पाच विकेट्स घेतल्या. न्यूझीलंडने ही मालिका 2-1 ने जिंकली असली, तरी ‘हारकर भी जितनेवाला बाझीगर’ लसिथ मलिंगाच ठरला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ही ओव्हरऑल 100 वी विकेट होती.

विशेष म्हणजे, मलिंगाची ही दुसरी हॅट्ट्रिक आहे. याआधी, दक्षिण आफ्रिकेविरोधात 2007 मधील वनडे वर्ल्डकपमध्ये त्याने ही कामगिरी बजावली होती. त्यामुळे आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये दोन वेळा हॅट्ट्रिक घेणारा 36 वर्षांचा लसिथ मलिंगा हा पहिलाच गोलंदाज आहे.

दोनच गोलंदाजांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चार चेंडूंवर चार विकेट

वनडे : मलिंगा विरुद्ध दक्षिण आफ्रिका (2007)
टी20 : मलिंगा विरुद्ध न्यूझीलंड (2019)
टी20 : राशिद खान (अफगाणिस्तान) विरुद्ध आयर्लंड (2019)

मलिंगाच्या 5 देशांविरोधात 5 हॅट्ट्रिक

वनडे मध्ये तीन हॅट्ट्रिक

2007 : 4 विकेट (द. आफ्रिका)
2011 : 3 विकेट (केनिया)
2011 : 3 विकेट (ऑस्ट्रेलिया)

टी20 मध्ये दोन हॅट्ट्रिक

2017 : 3 विकेट (बांगलादेश)
2019 : 4 विकेट (न्यूझीलंड)

तिन्ही फॉर्मेटमध्ये सर्वाधिक विकेट श्रीलंकेच्या गोलंदाजांच्या

कसोटी : मुरलीधरन (800 विकेट)
वनडे : मुरलीधरन (534 विकेट)
टी20 : मलिंगा (104 विकेट)