Lionel Messi: संघाचा पराभव पाहून लियोनेल मेसीचा मैदानातच पारा चढला! रागाच्या भरात प्रतिस्पर्ध्याच्या तोंडावर बॉल मारला अन्…; व्हिडिओ व्हायरल
Argentine Star Lionel Messi Hits Opponent With Ball: लिओनेल मेस्सीने मैदानावर आपला संयम गमावला. प्रतिस्पर्ध्याच्या चेहऱ्यावर बॉल मारला. पण पंचांनी रेड कार्ड दाखवले नाही.

अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सी सध्या मेजर लीग सॉकरमध्ये त्याच्या इंटर मायामी क्लबकडून खेळत आहे. एका सामन्यादरम्यान तो वादात सापडला. मेस्सीने बॉलने विरोधी खेळाडूच्या चेहऱ्यावर मारले. त्यानंतर पंचांनी त्याला यलो कार्ड दाखवले. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मेस्सीला लाल कार्ड न देण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
इंटर मायामी आणि कोलंबस क्रू यांच्यातील एमएलएस प्लेऑफ सामन्यादरम्यान मेस्सीने गोंझालो तापियाच्या चेहऱ्यावर प्रहार केला. पंचांनी मेस्सीला रेड कार्ड देण्याऐवजी यलो कार्ड दाखवले. मात्र कोलंबस क्रूचे प्रशिक्षक लॉरेंट कोर्टोइस यांनी पंचांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मेस्सीला मैदानाबाहेर पाठवायला हवे होते असे म्हटले. ही घटना पहिल्या हाफच्या इंज्युरी टाइममध्ये घडली. मेस्सी थ्रो-इन घेणार होता, तेव्हा कोलंबसचा खेळाडू गोंझालो तापिया त्याच्यासमोर आला.
मेस्सीने पटकन थ्रो-इन घेतला आणि थेट तापियाच्या चेहऱ्यावर मारला. मार लागताच तापिया तात्काळ जमिनीवर कोसळला. त्यानंतर रेफरी ॲलन चॅपमन यांनी दोन्ही खेळाडूंना पिवळे कार्ड दाखवले. सामन्यानंतर कोलंबस क्रूचे प्रशिक्षक लॉरेंट कोर्टोइस यांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, मेस्सीला पिवळ्या कार्डापेक्षा अधिक गंभीर शिक्षा मिळायला हवी होती हे सर्वांनाच माहीत आहे. त्यांच्या मते, या घटनेत पंचांनी अधिक कठोर निर्णय घ्यायला हवा होता.
सामन्याचे पंच ॲलन चॅपमन यांनी आपल्या निर्णयाचा बचाव करत म्हटले की, चेंडू फेकण्यासाठी वापरलेले बळ नगण्य होते. ते हिंसक वर्तन नव्हते. याच कारणामुळे मेस्सीला लाल कार्ड देण्यात आले नाही. या वादाच्या पार्श्वभूमीवर इंटर मियामीला कोलंबस क्रू विरुद्ध घरच्या मैदानावर 0-3 असा पराभव पत्करावा लागला. कोलंबससाठी गोंझालो तापियाने दोन गोल केले, तर ताहा हॅब्रॉनने एक गोल केला.
विशेष म्हणजे, इंटर मियामी आधीच 10 खेळाडूंसह खेळत होता. 36 व्या मिनिटाला गोंझालो लुजानला रेड कार्ड दाखवण्यात आले. या पराभवानंतर इंटर मायामी प्लेऑफमधून बाहेर पडण्याच्या धोक्यात आहे. दोन्ही संघांमधील तीन सामन्यांच्या प्लेऑफ मालिकेतील पुढील सामना कोलंबसमध्ये खेळला जाईल. जर मेस्सीचा संघ हा सामना हरला, तर त्यांचा प्रवास तिथेच संपेल.