
संगीतकार पलाश मुच्छल आणि क्रिकेटपटू स्मृती मानधना यांचे लग्न 23 नोव्हेंबर 2025 रोजी होणार होते. मात्र त्याच दिवशी लग्नाच्या काही तास आधीच स्मृतीच्या वडिलांची तब्येत बिघडली, ज्यामुळे लग्न पुढे ढकलण्यात आले. मात्र त्यांची तब्येत आता बरी असून त्यांना डिस्चार्जही देण्यात आला आहे.पण अद्यापही स्मृती आणि पलाशच्या लग्नाबाबतची अपडेट मिळाली नाही. यादरम्यान मात्र बऱ्याच घटना समोर आल्या ज्यामुळे पलाशने स्मृतीला फसवल्याचा चर्चा सर्वत्र होऊ लागल्या आहेत. त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे मेरी डि’कोस्टा नावाच्या मुलीने व्हायरल केलेले चॅट.
मेरीने स्वतः चॅट्सचे स्क्रीनशॉट लीक केले होते
मेरी डि’कोस्टा नावाच्या मुलीसोबत पलाशच्या फ्लर्टी चॅटचे स्क्रीनशॉट व्हायरल झाले. सुरुवातीला असे वृत्त होते की ही महिला कोरिओग्राफर होती जिच्यासोबत पलाशचे प्रेमसंबंध होते. तथापि, मेरी डि’कोस्टाने आता या प्रकरणावर मौन सोडले आहे. मेरी डि’कोस्टाची एक नवीन पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात तिने असा दावा केला आहे की ती कोरिओग्राफर नाही आणि पलाशला ती कधीही भेटली नाही. त्याचे जे काही बोलणे झाले ते फक्त चॅटवरच झाले असून. तिने स्वतः चॅट्सचे स्क्रीनशॉट लीक केले होते. परंतु आता तिलाच लक्ष्य केले जात आहे. मेरी डि’कोस्टाने असेही म्हटले की या वादामुळे तिला तिचे अकाउंट खाजगी करावे लागले.
‘स्मृती मानधनाचा खूप आदर करते…’
मेरी डि’कोस्टाने तिच्या व्हायरल पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, “मीच ती व्यक्ती आहे जिने चॅट्सचे स्क्रीनशॉट व्हायरल केले आहेत. मला कधीच माझी ओळख उघड करायची नव्हती. आमच्यातले हे चॅट्स मे ते जुलै 2025 दरम्यानचे आहेत आणि हे चॅट फक्त एक महिने चालले. मी त्याला कधीच भेटले नाही, किंवा मी त्याच्याशी कोणत्याही नात्यात नव्हते. मी फक्त त्याला हायलाइट केले कारण मला क्रिकेट आवडते, मी स्मृती मानधनाचा खूप आदर करते आणि मला वाटले की लोकांना हे कळलेच पाहिजे की त्याने काय केले. मी कोरिओग्राफर नाही किंवा ज्या व्यक्तीला त्याने फसवले ती व्यक्तीही मी नाही.”
मेरी डि’कोस्टाने तिचे इंस्टाग्राम अकाउंट खाजगी केले
डि’कोस्टाने पुढे लिहिले की, “मला अशा प्रकारच्या विरोधी प्रतिक्रियांची अपेक्षा नव्हती आणि मला माझे अकाउंट खाजगी करावे लागले. चॅटवरून स्पष्टपणे दिसून येते की यात माझी काहीही चूक नव्हती. मीच त्याच्याकडे दुर्लक्ष करत होते. कृपया मला लक्ष्य करू नका. मी खरोखर हे सहन करू शकत नाही. मला हे कधीच नको होते. मला वाटले होते की लोक समजतील कारण चॅटमध्ये तुम्हाला स्पष्टपणे दिसत आहे की ही माझी चूक नव्हती आणि मीच त्याला घोस्ट बनवले होते. मी कोणत्याही महिलेचे कधीही वाईट करणार नाही, मग ती प्रसिद्ध असो वा नसो.”
मेरी डि’कोस्टाने चॅट का केले व्हायरल?
असं म्हणत मेरी डि’कोस्टाने नक्की हे चॅट काय होते, तिचा आणि पलाशचा काय संबंध होता याबद्दल या पोस्टमध्ये तिने स्पष्टच सांगितले आहे. तसेच ती त्याच्यासोबत रिलेशनमध्ये नव्हती पण तिच्यासोबत पलाशने जे फ्लर्टी चॅट केले होते त्यावरून लोकांना हे समजले पाहिजे, हे समोर आले पाहिजे म्हणून चॅट व्हायरल केल्याचं मेरीने सांगितले. याचा अर्थ स्मृतीसोबत असताना पलाशने मेरीसोबत ज्यापद्धतीने चॅट केले त्यावरून त्याने स्मृतीची एकप्रकारे फसवणूक केल्यासारखंच असल्याचं नेटकरी म्हणत आहे. सगळेच आता पलाश आणि स्मृती याबद्दल कधी बोलणार याची वाट पाहत आहेत.