124 मिनिटं आणि 44 सेकंद आणि बेल्जियमचा विजय, FIFA वर्ल्डकप इतिहासात सर्वात उशिरा मारलेला गोल

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत राउंड ऑफ 32 या बाद फेरीचे सामने सुरू आहे. या सामन्यातील विजयी संघाला पुढच्या फेरीचं म्हणजेच उपउपांत्यपूर्व फेरीचं तिकीट मिळणार आहे. असं असताना बेल्जियमने या फेरीत धडक मारली आहे. पण हा विजय काही सोपा नव्हता.

124 मिनिटं आणि 44 सेकंद आणि बेल्जियमचा विजय, FIFA वर्ल्डकप इतिहासात सर्वात उशिरा मारलेला गोल
124 मिनिटं आणि 44 सेकंद आणि बेल्जियमचा विजय, FIFA वर्ल्डकप इतिहासात सर्वात उशिरा मारलेला गोल
Image Credit source: GETTY IMAGES
| Updated on: Jul 02, 2026 | 7:35 PM

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत काही सामने पाहताना अक्षरश: अंगावर काटा येतो. कोणाच्या बाजूने निकाल लागणार याची उत्सुकता असते. असे काही सामने या स्पर्धेत आतापर्यंत पडले. या स्पर्धेतील बेल्जियम आणि सेनेगल यांच्यात खेळला गेलेल्या सामन्याबाबत असं म्हणावं लागेल. कारण या सामन्यात गोल तर झाले पण सामना कुठे झुकणार? आणि निर्णायक गोल कोण मारणार? याची उत्सुकता होती. या थरारक सामन्यात बेल्जियमने शेवटच्या काही मिनिटात बाजी पालटली. खरं तर बेल्जियम दोन गोलने पिछाडीवर होता. त्यामुळे हा सामना सेनेगल जिंकणार असंच वाटतं होतं. पण बेल्जियमने निर्धारित वेळेच्या शेवटच्या काही मिनिटात दोन गोल मारले. तसेच सामना अतिरिक्त वेळेत गेल्यानंतर शेवटच्या सेकंदात गोल मारून 3-2 ने विजय मिळवला. या विजयासह बेल्जियमने राउंड ऑफ 16 म्हणजेच उपउपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे.

सेनेगलची 2-0 ने आघाडी, आणि चित्र पालटलं

फिफा वर्ल्डकप स्पर्धेच्या या सामन्यात 24 व्या मिनिटाला सेनेगलच्या हबीब दियाराने गोल मारला आणि आघाडी घेतली. त्यानंतर पहिला हाफवर सेनेगलचं वर्चस्व राहिलं. त्यानंतर 51 व्या मिनिटाला इस्माईल सारने गोल मारला आणि 2-0 ने आघाडी घेतली. त्यामुळे बेल्जियमवर पराभवाचं सावट गडद झालं. बेल्जियमच्या प्रशिक्षकांनी 56व्या मिनिटाला एक बदल केला. केविन डी ब्रुयन आणि जेरेमी डोकू या स्टार खेळाडूंना बाहेर काढलं. तर गोलरक्षक कोर्तुआने तीन गोल वाचवले आणि सेनेगलला मोठी आघाडी घेण्यापासून रोखलं.

बेल्जियमच्या हातून सामना निसटत असताना रोमेलू लुकाकू मैदानात बदली खेळाडू म्हणून उतरला आणि 86व्या मिनिटला गोल मारला. त्यानंतर तीन मिनिटांनी म्हणजेच 89व्या मिनिटाला युरी टिलेमन्सने गोल मारून 2-2 बरोबरी साधली. त्यामुळे हा सामना अतिरिक्त वेळेत गेला. अतिरिक्त वेळेत सामना बरोबरीत सुटणार असंच वाटत होतं. त्यामुळे निकाल पेनल्टी शूटआऊटमध्ये जाईल असं वाटलं. पण अतिरिक्त वेळेच्या 125व्या मिनिटाला फाउल झाला आणि बेल्जियमच्या बाजूने पेनल्टी दिली. युरी टिलेमन्सने पेनल्टीचं रुपांतर गोलमध्ये केलं आणि संघाला 3-2 ने विजय मिळवून दिला. विशेष म्हणजे हा विजयी गोल फिफा वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात सर्वात उशिराने मारलेला ठरला. यापूर्वी 2014 फिफा वर्ल्डकप स्पर्धेत अल्जेरियाच्या अब्देलमौमेन जोबाउने 121व्या मिनिटाला गोल मारला होता.

Follow Us