Asian Games 2026: आशियाई खेळांचे मेडल कोणी डिझाईन केले? जाणून घ्या या खास पदकाची 5 वैशिष्ट्ये!
Asian Games 2026 Medals: आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 च्या पदकांचे डिझाईन सध्या चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनले आहे. एका राष्ट्रीय डिझाईन स्पर्धेच्या माध्यमातून या खास पदकांची निवड करण्यात आली आहे...

जपानमधील आयची-नागोया येथे आयोजित 20 व्या आशियाई क्रीडा स्पर्धांच्या पदकांची रचना सध्या जगभरात चर्चेचा विषय बनली आहे. तिची कलात्मकता, सांस्कृतिक वारसा आणि आधुनिक विचार यामुळे या पदकांना चाहत्यांची मोठी पसंती मिळत आहे. राष्ट्रीय डिझाईन स्पर्धेतून निवडलेली ही पदके प्रसिद्ध जपानी डिझायनर डाइसुके शिबा यांनी तयार केली आहेत. डाइसुके शिबा यांची ही संकल्पना खेळांचे अधिकृत घोषवाक्य “इमॅजिन वन एशिया” आणि “युनिटी इन डायव्हर्सिटी” (विविधतेतून एकता) या विचारावर आधारित आहे. ही रचना क्रीडा क्षेत्रात आशिया खंडातील विविध संस्कृती आणि भाषांच्या एकत्र येण्याचे प्रतिनिधित्व करते.
पदकाचा अंतिम आकार निश्चित करण्यासाठी डिझायनर शिबा यांनी एक अनोखा प्रयोग केला. त्यांनी मुद्दाम अनेक सिरॅमिक चकत्या तोडल्या आणि त्यांचे तुकडे एकमेकांमध्ये कसे बसतात याचा सखोल अभ्यास केला. एका खेळाडूचा प्रवास हा अपयश, दुखापत, संघर्ष आणि कठोर परिश्रम यांच्या विखुरलेल्या क्षणांनी बनलेला असतो. जेव्हा हे सर्व तुकडे एकत्र येतात, तेव्हा ते पदकाच्या रूपात खेळाडूच्या यशाचे अंतिम प्रतीक बनतात, हाच संदेश या डिझाईनमधून देण्यात आला आहे.
आशियाई खेळ 2026 च्या मेडलची पाच प्रमुख वैशिष्ट्ये
- कचऱ्यापासून बनवले मेडल (Recycled E-Waste): पर्यावरण संरक्षण आणि चक्रीय अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी एक खास पाऊल उचलण्यात आले आहे. जपानमधील महानगरपालिकांनी गोळा केलेल्या जुन्या आणि लहान इलेक्ट्रॉनिक कचऱ्यातून मौल्यवान धातू वेगळे करून ही पदके बनवण्यात आली आहेत.
- ‘काकित्सुबाता’ फुलाची रिबन: पदकाच्या रिबनवर आयची प्रांताचे अधिकृत फूल असलेल्या ‘काकित्सुबाता’ची सुंदर आकृती आहे. त्यावरील वक्र नक्षी खेळाडूंचा कणखरपणा आणि त्यांचे सामर्थ्य दर्शवते.
- हिनोकी लाकडाची पारंपारिक पेटी: पदक ठेवण्यासाठी बनवलेली पेटी जपानच्या पारंपारिक चहा संस्कृतीपासून प्रेरित आहे. ही पेटी आयची येथील प्रसिद्ध आणि सुगंधी ‘हिनोकी’ लाकडापासून बनवण्यात आली आहे.
- पदकांचा आकार आणि व्यास: सर्व पदके 8 सेमी व्यास आणि 5 मिमी जाडीच्या गोलाकार स्वरूपात अगदी अचूकतेने बनवलेली आहेत.
- मेडलचे वजन आणि धातूचे गणित: सुवर्ण पदक (Gold Medal): वजन अंदाजे 265 ग्रॅम. हे शुद्ध चांदीपासून बनवलेले असून, त्यावर किमान 1 ग्रॅम सोन्याचा मुलामा दिलेला आहे. रौप्य पदक (Silver Medal): वजन अंदाजे 264 ग्रॅम. हे पूर्णपणे शुद्ध चांदीपासून बनवलेले आहे.कांस्य पदक (Bronze Medal): वजन अंदाजे 222 ग्रॅम. हे 95% तांबे आणि 5% जस्त (Zinc) यांपासून बनलेले आहे.