
उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमधून एक धक्कादायक आणि क्रीडाविश्वाला हादरवणारी बातमी समोर आहे. फराना गावातील 22 वर्षीय कबड्डीपटू बृजेश सोलंकी याचा कुत्रा चावल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मार्च 2025 मध्ये त्याला कुत्र्याच्या छोट्या पिल्लाने चावा घेतला होता. मिडिया रिपोर्टनुसार, गटारात पडलेलं पिल्लाला बाहेर काढण्याच्या प्रयत्नात असताना त्याे बृजेशला चावा घेतला. पिल्लाने त्याच्या उजव्या हाताचे बोट चावले. पण या जखमेकडे दुर्लक्ष करत रेबीज प्रतिबंधक इंजेक्शन घेतलं नाही. त्यामुळे त्याला रेबीज झाला. दोन महिन्यांनी म्हणजेच जून 2025 मध्ये बृजेशला त्याच्या उजवा हात सुन्न आणि थंड पडल्याचं जाणवलं. तसेच हवा आणि पाण्याची भीती वाटू लागली. तपासणीनंतर त्याला रेबीज झाल्याचं निष्पन्न झालं. खेळाडूच्या शरीरात काही दिवसांनी रेबीजची लक्षणं अधिक तीव्रतेने दिसल्याने रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी देखील वाचवणं कठीण असल्याचं सांगितलं. त्यानंतर त्याला गावी पुन्हा आणताना वाटेतच वेदनेने त्याचा मृत्यू झाला.
बृजेशने फेब्रुवारी 2025 मध्ये राज्यस्तरीय कबड्डीमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. याशिवाय त्याने इतर स्पर्धांमध्येही अनेक पदके जिंकली आहेत. सध्या प्रो कबड्डी लीग 2026 ची तयारी करत होता. बृजेशचा मृत्यू हा निष्काळजीपणामुळे झाल्याचं समोर आलं आहे. जर त्याने कुत्रा चावल्यानंतर लगेचच अँटी-रेबीज लस घेतली असती तर त्याचे प्राण वाचू शकले असते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, चावल्यानंतर शक्य तितक्या लवकर रेबीज लस घेणं आवश्यक आहे. त्याने लस घेण्यास टाळाटाळ केली आणि विषाणू त्याच्या मज्जासंस्थेत पसरला.
जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, जगात दरवर्षी 26,000 ते 59,000 लोकांचा मृत्यू रेबिजमुळे होतो. यापैकी 95 टक्क्यांहून अधिक प्रकरणे आशिया आणि आफ्रिकेत नोंदवली जातात. रेबीज हा जीवघेणा विषाणूजन्य आजार आहे. न्यूरोट्रॉपिक विषाणू मानवांच्या मध्यवर्ती मज्जासंस्थेवर परिणाम करतो. यामुळे मेंदूला सूज येते आणि तीव्र वेदना होतात. याला हायड्रोफोबिया किंवा वॉटर फोबिया असेही म्हणतात. कारण या लक्षणांमुळे पाण्यापासून भीती वाटू लागते.
कुत्रा चावल्यानंतर पहिली अँटी रेबीज लस ही 24 तासाच्या आत घेणं आवश्यक आहे. कुत्रा चावला त्या दिवशी, तिसऱ्या, सातव्या आणि चौदाव्या दिवशी असे चार डोस असतात. गंभीर प्रकरणात रेबीज इम्यून ग्लोब्युलिन देखील दिले जाते.