
टीम इंडियाने दक्षिण आशियाई फुटबॉल फेडरेशन अंडर 20 चॅम्पियनशिप स्पर्धेत जबरदस्त सुरुवात केली आहे. टीम इंडियाने या स्पर्धेत विजयी सलामी दिली आहे. टीम इंडियाने आपल्या पहिल्याच सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा एकतर्फी फरकाने धुव्वा उडवला आहे. टीम इंडियाने पाकिस्तानला 3-0 ने लोळवलं. भारताने या विजयासह सेमी फायनलचं तिकीट मिळवलं आहे. तर पाकिस्तानचा हा सलग आणि एकूण दुसरा पराभव ठरला. पाकिस्तानचं या पराभवासह स्पर्धेतून पॅकअप झालं आहे.
पाकिस्तानला टीम इंडियाआधी बांगलादेश विरूद्ध 24 मार्चला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे पाकिस्तानसाठी टीम इंडिया विरुद्धचा सामना हा करो या मरो असा होता. मात्र भारतीय खेळाडूंसमोर पाकिस्तानला बांगलादेशप्रमाणे या सामन्यातही एकही गोल करता आला नाही. यासह पाकिस्तानचा स्पर्धेतून यशस्वीरित्या बाजार उठला.
भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामन्याचं आयोजन हे मालदीवची राजधानी माले येथील नॅशनल फुटबॉल स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं. भारताने या सामन्यात पाकिस्तानवर सुरुवातीपासूनच पकड मिळवली. भारताने तिसऱ्याच मिनिटाला आपलं खातं उघडलं. विशाल यादव याने भारतासाठी पहिला गोल केला. त्यानंतर टीम इंडियाचा पहिल्या सत्रात आघाडी आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न होता. मात्र या प्रयत्नांना यश आलं नाही. त्यामुळे भारताला पहिल्या सत्रात 1-0 वर समाधान मानावं लागलं.
त्यानंतर टीम इंडियासाठी ओमांग डोडुम याने दुसऱ्या सत्रात कमाल केली. ओमांगने 2 गोल केले. त्यामुळे भारताने ही आघाडी 3-0 ने मजबूत केली. इतकंच नाही तर भारताने ही आघाडी शेवटपर्यंत कायम राखण्यात यश मिळवलं.
ओमांगने दुसऱ्या सत्रात 64 व्या मिनिटाला गोल केला. भारताने यासह दुसरा गोल केला. टीम इंडियाच्या दुसऱ्या गोलमुळे पाकिस्तान मानसिकरित्या खचली. त्यानंतर 88 व्या मिनिटाला भारताला पेन्लटी मिळाली. ओमांगने ही संधी न दवडता कमाल केली. ओमांगने पुन्हा एकदा गोल केला. ओमांगच्या या एकूण सलग दुसऱ्या गोलसह भारताला विजय निश्चित झाला.
आता टीम इंडिया या मोहिमेतील आपल्या दुसऱ्या सामन्यात बांगलादेश विरुद्ध भिडणार आहे. हा सामना शनिवारी 28 मार्चला होणार आहे. त्यानंतर टीम इंडिया 1 एप्रिलला उपांत्य फेरीतील सामना खेळणार आहे. टीम इंडियाचा हा सामना जिंकून फायनलमध्ये पोहचण्याचा प्रयत्न असणार आहे.