
ग्रेटर नोएडा येथील शहीद विजय सिंह पथिक क्रीडा संकुलात झालेल्या वर्ल्ड बॉक्सिंग कप फायनल 2025 भारतीय बॉक्सरचा दबदबा राहीला. 16 नोव्हेंबरला सुरु झालेल्या या स्पर्धेत 20 भारतीय बॉक्सरने भाग घेतला होता. त्यात 10 पुरुष आणि 10 महिला बॉक्सर होत्या. 15 बॉक्सरने अंतिम फेरी गाठली आणि त्यापैकी 9 जणांनी सुवर्ण पदक पटकावलं. सात गोल्ड मेडल हे महिलांनी आणले. मिनाक्षी हुड्डाने 48 किलो वजनी गटात उझबेकिस्तानची बॉक्सर फरझोना फोझिलोवा हिचा अंतिम फेरीत 5-0 असा पराभव करून देशाच्या पहिल्या सुवर्णपदकाची सुरुवात केली. महिलांच्या 54 किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात प्रीतीने इटलीच्या सिरीन चाराबीला 5-0 असे हरवून भारतासाठी आणखी एक सुवर्णपदक जिंकले. महिलांच्या 70 किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात अरुंधती चौधरीने उझबेकिस्तानच्या झोकिरवा अझिझाला 5-0 असे हरवून भारतासाठी सुवर्णपदकाची हॅटट्रिक पूर्ण केली. 80 प्लस किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत नुपूर शेओरनने उझबेकिस्तानच्या सोतिम्बोएवा ओल्टिनॉयवर 5-0असा विजय मिळवत दिवसाचे चौथे सुवर्णपदक जिंकले.
TV9English ने दिलेल्या वृत्तानुसार, पाच वेळा राष्ट्रीय विजेत्या हरियाणाच्या नुपूरने विश्वचषकात सुवर्णपदक जिंकण्याची प्रतिज्ञा केली होती. आज तिचं स्वप्न सत्यात उतरलं आहे. नुपूरच्या कुटुंबात बॉक्सिंगची परंपरा आहे. “सुवर्णपदक जिंकून खूप छान वाटत आहे. आज मी अखेर शांत झोपू शकेन. मी नक्कीच 8-9 तास झोपेन कारण जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक जिंकल्यानंतर माझी झोप उडाली होती.” असे नुपूरने वर्ल्ड बॉक्सिंग कप 2025 च्या फायनलमध्ये ऐतिहासिक विजयानंतर टीव्ही 9 शी बोलताना सांगितले.
“मी बहुतेक वेळा क्रॉस पंच वापरून काउंटर-बॉक्सर म्हणून खेळते. म्हणून आम्ही माझ्या हल्ल्यांवर जास्त काम केले. मी माझा आक्रमक खेळ सुधारण्यावर लक्ष केंद्रित केले आणि आज तुम्ही पाहिले असेल की माझा प्रतिस्पर्धी खेळाडू जास्त हल्ला करू शकला नाही. कारण तिला माहित होते की मी जोरदार काउंटर पंच खेळते. म्हणूनच मी माझ्या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली माझी आक्रमण शैली सुधारली.” असं नुपूरने पुढे सांगितलं.
निखतने 51 किलो वजनी गटात भारताचे पाचवे सुवर्णपदक जिंकले. जास्मिन लांबोरियाने 57 किलो वजनी गटात देशासाठी सुवर्णपदक जिंकले. तर अनेक महिने बॉक्सिंग रिंगपासून दूर असलेल्या परवीन हुड्डाने 60 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकून पुनरागमन केले. भारताच्या सचिन सिवाचने पुरुषांच्या 60 किलो गटात देशाचे पहिले सुवर्णपदक जिंकले. हितेश गुलियाने रिंगमध्ये आपले कौशल्य दाखवत सुवर्णपदकावर जोरदार मुक्का मारला आणि नववे गोल्ड जिंकले.