
क्रीडा वर्तुळातून या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. टेनिसमधील मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या विम्बल्डन 2025 स्पर्धेतील पुरुष एकेरीचा महाअंतिम सामना रविवारी पार पडला. या महाअंतिम सामन्यात कार्लोस अल्काराज विरुद्ध यानिक सिनर आमनेसामने होते. इटलीच्या यानिक सिनरने या फायनलमध्ये कार्लोस अल्काराज याचा 4-6, 6-4, 6-4, 6-4 अशा फरकाने धुव्वा उडवत इतिहास घडवला. सिनर या विजयासह पहिल्यांदाच विम्बल्डन चॅम्पियन ठरला. सिनरने 24 वेळा ग्रँड स्लॅम चॅम्पियन असलेल्या नोवाक जोकोविचचा पराभव करत अंतिम सामन्यात धडक दिली होती. त्यानंतर सिनरने अंतिम सामन्यातही विजय मिळवत अविस्मरणीय अशी कामगिरी करुन दाखवली आहे.
सिनरने या महाअंतिम सामन्यात दमदार कामगिरी केली. यानिकने यासह त्याला टेनिस विश्वातील युवा स्टार का म्हटलं जातं हे पुन्हा एकदा सिद्ध करुन दाखवलं. अल्काराजने सामन्याच्या पहिला सेट 6-4 अशा फरकाने जिंकला. मात्र सिनरने पहिला सेट गमावल्यानतंर जोरदार कमबॅक केलं. सिनरने तिन्ही सेट जिंकत हॅटट्रिक केली आणि चॅम्पियन होण्याचा बहुमान मिळवला. यानिकच्या कारकीर्दीतील हे चौथं ग्रँड स्लॅम ठरलं आहे.
सिनरचा अंतिम फेरीपर्यंत पोहचण्याचा प्रवास थरार आणि रोमांचक राहिला. सिनरने 24 वेळा ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या दिग्गज नोवाक जोकोविचचा धुव्वा उडवत फायनलमध्ये धडक दिली. सिनरसाठी नोवाकचा पराभव करण मोठा बहुमान ठरला. नोवाकचा पराभव केल्याने सिनरचा विश्वास वाढला. सिनरने याच विश्वासासह अंतिम फेरीत अप्रतिम कामगिरी केली. सिनरने यासह अंतिम फेरीत गतविजेत्या अल्काराजला नमवलं.
चॅम्पियन यानिक सिनर
S1NNER 🏆
World No.1 Jannik Sinner defeats Carlos Alcaraz to claim his first Wimbledon title 🇮🇹 pic.twitter.com/s9wjDI1gZS
— Wimbledon (@Wimbledon) July 13, 2025
दरम्यान महाअंतिम सामन्यात विजय मिळवताच यानिक सिनरच्या संपत्ती कोटींनी वाढ झाली आहे. यानिकला या ऐतिहासिक विजयानंतर प्राईज मनी देण्यात आली. सिनरला 3,000,000 पाउंड अर्थात जवळपास 34 कोटी (भारतीय रुपये) बक्षिस म्हणून मिळाले. तर उपविजेता अल्काराजही मालमाल झाला. अल्काराज याला उपविजेता म्हणून 1,520,000 पाउंड अर्थात जवळपास 17 कोटी (भारतीय रुपये) देण्यात आले.