पूरग्रस्तांसाठी ‘देव’ धावला, रहाणेपाठोपाठ सचिन तेंडुलकरकडून मदत

| Updated on: Aug 14, 2019 | 8:05 AM

विक्रमादित्य क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने पंतप्रधान मदत निधीच्या माध्यमातून देशभरातील पूरग्रस्त भागांना मदत केली आहे. नागरिकांना आर्थिक सहाय्य करण्याचं आवाहनही त्याने केलं आहे

पूरग्रस्तांसाठी देव धावला, रहाणेपाठोपाठ सचिन तेंडुलकरकडून मदत
Follow us on

मुंबई : कोल्हापूर-सांगलीतील महापुराचं पाणी (Kolhapur Sangli Flood) ओसरत असलं, तरी त्यानंतर उद्भवणाऱ्या समस्यांचा डोंगर कायम आहे. पूरग्रस्तांसाठी राज्यभरातून मदतीचा ओघ येत आहे. मराठमोळा क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) पूरग्रस्तांना मदतीचा हात दिल्यानंतर ‘क्रिकेटचा देव’ही मदतीसाठी सरसावला आहे. मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) ‘पंतप्रधान मदत निधी’तून आर्थिक सहाय्य केलं आहे.

‘देशभरात आलेल्या महापुराने विनाश ओढावला आहे. पाणीपातळी कमी होत असताना पूरग्रस्त राज्यांना मदतीची आवश्यकता आहे. मी ‘पंतप्रधान मदत निधी (https://pmnrf.gov.in/en/) च्या माध्यमातून मदत केली आहे. तुम्हा सर्वांना मदत आणि सहकार्य करण्याचं आवाहन करतो’ असं ट्वीट सचिनने केलं आहे.

एनडीआरएफच्या जवानांपासून सर्वसामान्यांपर्यंत अनेक जण पूरग्रस्तांना मदत करत असल्याचे फोटो सचिनने ट्विटरवर शेअर केले आहेत.

यापूर्वी अजिंक्य रहाणेनेही पूरग्रस्तांना मदत केली आहे. ‘आपल्याला माहित असेलच, महाराष्ट्रात सध्या पूरामुळे प्रचंड वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर-सांगली येथे विशेष मदतीची गरज आहे. अशा वेळी आपण पूरग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. मी मदत करून माझा खारीचा वाटा उचलतो आहे, आपणसुद्धा जमेल तशी मदत नक्की करा.’ असं आवाहन रहाणेने केलं होतं.

राज्य सरकारसह अनेक संस्था, संघटना, वैयक्तिक पातळीवरील अनेक गट मदत करत आहेत. अभिनेता सुबोध भावे, जितेंद्र जोशी, रवी जाधव, कुशल बद्रिके, हार्दिक जोशी (राणादा), अभिजीत चव्हाण, विजू माने, संतोष जुवेकर यासारख्या मराठी कलाकारांनी पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे.

अक्षय कुमार, रितेश देशमुख, अमिताभ बच्चन यासारखे बॉलिवूड कलाकार वगळता अपवादानेच मनोरंजन विश्वातून मदतीचा ओघ आलेला आहे. यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेने सेलिब्रिटींचे कानही पिळले होते.