
पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी तर चांगलाच भडकला आहे. खूप प्रयत्न करूनही तो कॅमेऱ्यासमोर त्याचा राग दाबू शकला नाही. जणू त्याचे मन खूप दुखावले गेले आहे असे दिसतयं. वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स (WCL) 2025 मध्ये रविवार 20 जुलै रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतिक्षित सामना रद्द झाल्यामुळे आफ्रिदीला चांगल्याच मिरच्या झोंबल्या असून त्याच रागातून तो वाट्टेर ते बरळला आहे. रतीय खेळाडूंनी त्याच्यासोबत, पाकिस्तानसोबत खेळण्यास नकार दिला हे पचवणं कदाचित शाहिद आफ्रिदीला खूप कठीम जात असेल. म्हणूनच त्याच्या तोंडून WCL मध्ये खेळणाऱ्या टीम इंडिया चॅम्पियन्सच्या खेळाडूंवर टीका होत आहे.
भारताच्या नकाराने आफ्रिदीला बसला धक्का ?
हरभजन सिंग, इरफान पठाण, युसूफ पठाण, शिखर धवन, सुरेश रैना आणि युवराज सिंग यांसारख्या इंडिया चॅम्पियन्सच्या खेळाडूंनी WCL 2025 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातून माघार घेतल्याची बातमी आली होती. म्हणजेच त्यांनी हा सामना खेळण्यास नकार दिला होता. आता जर 15 पैकी 5-6 खेळाडू खेळणार नसतील तर प्लेइंग इलेव्हन कसे तयार होईल? परिणामी, आयोजकांना सामना रद्द करावा लागला. आता, प्रत्येक कृतीची प्रतिक्रिया असते तशीच भारत-पाकिस्तान सामना रद्द झाल्यानंतर, पाकिस्तान चॅम्पियन्सचा कर्णधार शाहिद आफ्रिदीनेही त्यावर प्रतिक्रिया दिली.
भारत-पाकिस्तान सामना रद्द झाल्यानंतर शाहिद आफ्रिदी काय म्हणाला?
शेवटच्या क्षणी सामना रद्द झाल्याचा शाहिद आफ्रिदीने निषेध केला. भारतीय खेळाडूंनी पाकविरुद्ध खेळण्यास नकार दिल्याने त्याला खूप धक्का बसल्याचं त्याच्या विधानावरून दिसून आलं. या निर्णयासाठी शाहिद आफ्रिदीने थेट शिखर धवनला जबाबदार धरलं. पाकिस्तानच्या माजी कर्णधाराच्या मते, शाहिद आफ्रिदीच्या उपस्थितीत खेळण्यास शिखर धवनने उघड नकार दिल्याने भारतीय संघात मोठा गोंधळ उडाला.
“खेळ हा देशांना जवळ आणतो. जर राजकारण प्रत्येक गोष्टीत मध्यभागी आणलं तर तुम्ही पुढे कसे जाल? पण तुम्हाला माहिती आहे की नेहमीच एक कुजलेले अंडे असते जे सर्वकाही बिघडवते.” अशा शब्दांत शाहिद आफ्रिदीने स्थानिक पत्रकारांशी बोलताना टीका केली. शाहिद आफ्रिदीने सुरुवातीला शिखर धवनचे नाव न घेता त्याला लक्ष्य केले आणि नंतर वादासाठी भारतीय दिग्गजाला जबाबदार धरले.
मग घरीच रहायचं होतं ना..
शाहिद आफ्रिदीने शिखर धवनला ‘अडथळा आणणारा’ म्हटलं. एवढंच होतं तर शेवटच्या क्षणी माघार घेण्याऐवजी संपूर्ण भारतीय संघ भारतातच राहिला पाहिजे होता असंही तो म्हणाला. जर भारताला आमच्याविरुद्ध खेळायचे नव्हते, तर त्यांनी इथे येण्याआधीच नकार द्यायला हवा होता. पण, भारतीय खेळाडू केवळ आलेच नाहीत तर सरावही केला आणि नंतर अचानक खेळण्यास नकार दिला. . मला वाटतं त्यांनी फक्त एका खेळाडूमुळे सामन्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघही खूप निराश आहे. ते इथे खेळण्यासाठी आले होते. तुम्ही देशाचे चांगले राजदूत असले पाहिजे, लाजिरवाणे नाही.’ अशा शब्दात त्याने बरीच गरळ ओकली. क्रिकेटला राजकारणापासून दूर ठेवावं हाच त्याचा राग त्याने पुन्हा आळवला.
आफ्रिदीमुळे सामना रद्द ?
WCL 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तानी संघांमधील सामना 20 जुलै रोजी बर्मिंगहॅम येथे होणार होता. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार देण्यामागे शाहिद आफ्रिदी देखील कारणीभूत आहे. कारण पहलगाम हल्ल्यादरम्यान हा पाकिस्तानी क्रिकेटपटू त्याच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत होता.
फायनलमध्ये भारत-पाक आमने-सामने आल्यास काय होईल ?
भारतासोबतचा सामना रद्द झाल्यानंतर, पाकिस्तान चॅम्पियन्स संघाच्या मालकाने सांगितले की, त्यांना पूर्ण 2 गुण मिळाल्याबद्दल त्यांना आनंद आहे, जे त्यासाठी पात्र होते. ते म्हणाले की, भविष्यातील सामने वेळापत्रकानुसार होतील. बाद फेरीत, आम्ही भारत आणि पाकिस्तान एकमेकांशी भिडणार नाहीत याची खात्री करण्याचा प्रयत्न करू. पण हे दोन्ही संघ अंतिम फेरीत पोहोचले तर तेव्हा काय करायचा याचा निर्णय तेव्हाच घेतला जाईल.