सूर्यकुमार यादवकडून कर्णधारपद काढा, स्टार क्रिकेटरचं धक्कादायक विधान; केली मोठी मागणी!

भारताचा माजी क्रिकेटपटू सौरभ गांगुली यांनी मोठं विधान केलं आहे. त्यांनी सूर्यकुमार यादव याच्याकडून कर्णधारपद काढून घ्यावे, असे मत व्यक्त केले आहे.

सूर्यकुमार यादवकडून कर्णधारपद काढा, स्टार क्रिकेटरचं धक्कादायक विधान; केली मोठी मागणी!
suryakumar yadav
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 09, 2025 | 5:16 PM

Shubman Gill Captaincy : भारतीय क्रिकेट सध्या वेगवेगळ्या स्थित्यंतरातून जात आहे. एकीकडे विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये जोरदार कमबॅक केले आहे. तर दुसरीकडे भारतीय संघाला सूर्यकुमार यादव आणि शुबमन गिल यासारखे तरुण खेळाडू कर्णधार म्हणून लाभले आहेत. टी-20 आणि एकदिवसीय अशा वेगवेगळ्या क्रिकेट फॉरमॅटमध्ये हे दोघाही भारतीय संघाचे नेतृत्त्व करत आहेत. सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांच्या एका टी-20 मालिकेचा थरार रंगला आहे. असे असतानाच आता भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज क्रिकेटपटू सौरभ गांगुली यांनी मोठे विधान केले आहे. त्यांनी सूर्यकुमार यादव याच्याकडील कर्णधारपद काढून ते शुबमन गिल याच्याकडे द्यावे, असे मत व्यक्त केले आहे. आता गांगुली यांच्या या विधानानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

शुबमन गिलनेच संघाचे नेतृत्त्व करावे

भारताची दक्षिण आफ्रिकेविरोधातील टी-20 सिरीज चालू होण्याच्या अगोदर सौरभ गांगुली यांचे हे विधान समोर आले आहे. सौरभ गांगुली हे बीसीसीआयचे अध्यक्षही राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या या मताला एक वेगळे महत्त्व आहे. सध्या टी-20 सामन्यांसाठी भारतीय संघाचे सूर्यकुमार यादव याच्याकडे नेतृत्त्व आहे. तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये शुभमन गिल संघाचे नेतृत्त्व करतो. मात्र टी-20 फॉरमॅटमध्ये शुभमन गिल यानेच संघाचे नेतृत्त्व करावे, असे गांगुली थेट म्हणाले आहेत. कोलका येथील ईडन गार्डन येथे एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात गांगुली यांनी तसे मत व्यक्त केले आहे.

शुबमन गिलने संघाचे चांगले नेतृत्त्व केले

“मला वाटतं की शुबमन गिल याच्याकडे क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटचे नेतृत्त्व द्यायला हवे. इंग्लंडच्या दौऱ्यावर असताना शुबमन गिल याने संघाचे चांगले नेतृत्त्व केलेले आहे. त्यावेळी भारतीय संघात विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दिग्गज खेळाडू नव्हते. पण शुबमन गिल याने संघाचे चांगल्या पद्धतीने नेतृत्त्व केले. फलंदाजी आणि कर्णधारपद अशा दोन्ही पातळ्यांवर चांगले काम करताना दिसला. त्याला सर्व फॉरमॅटमध्ये कर्णधार केले आहे,” असे मत सौरभ गांगुली यांनी व्यक्त केले. त्यामुळे आता भविष्यात काय घडणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.