
भारतीय क्रिकेट संघ (Team India) सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळत आहे. तिसरी मॅच जिंकून भारतीय संघाने 2-1 अशी आघाडी घेतली आहे. तर चौथी मॅच आज (17 डिसेंबर) लखनौमध्ये खेळण्यात येणार असून या सामन्यातही विजय मिळवून मालिकेत विजय मिळवण्याचा भारतीय संघाचा मानस आहे. मात्र या सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या स्टार खेळाडूंनी छोटा ब्रेक घेत सध्या बॉक्स ऑफीसवर धूमाकूळ माजवणारा ‘धुरंधर’ (Dhurandhar) चित्रपट पाहिला. रणवीर सिंगची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचा सध्या सर्वत्र बोलबाला आहे. टीम इंडियानेही हा चित्रपट पाहण्याचा आनंद लुटला. सोशल मीडियावर त्यांचे व्हिडीओ समोर आले असून एका व्हिडिओमध्ये, भारताचा सलामीवीर शुबमन गिल , अभिषेक शर्मा आणि इतर सहकाऱ्यांसह लखनौमधील एका मल्टिप्लेक्समध्ये दिसला.
रणवीर सिंगचा ‘धुरंधर’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. त्याच्या आणि इतर कलाकारांच्या अभिनयाचे कौतुक होत आहे. अक्षय खन्नाचा रेहमान डकैतही लोकांना खूप आवडला आहे. चित्रपटाची कथा खूपच घट्ट बांधलेली असून लोकांना कलाकारांचं काम पसंत पडत आहे. रणवीर सिंग या चित्रपटात एका भारतीय गुप्तहेराची भूमिका साकारत आहे जो पाकिस्तानमध्ये राहतो आणि शेजारी देशाच्या नापाक कारस्थानांची माहिती भारताला देतो.
टीम इंडियाच्या कोणत्या खेळाडूंनी पाहिला धुरंधर ?
टीम इंडियाच्या अनेक सदस्यांनी हा चित्रपट पाहिला. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये, टी-20 मालिका खेळणारे टीममधील अनेक स्टार खेळाडू धुरंधर बघायला गेल्याचे येताना दिसत आहेत. सर्वात पुढे शुबमन गिल असून तो त्याचा सहकारी आणि सलामीवीर अभिषेक शर्मासोबत दिसत आहे. त्यांच्या मागे, कर्णधार सूर्यकुमार यादव आनंदी मूडमध्ये दिसला. हर्षित राणा त्याच्या मागून येत होता. तसेच शिवम दुबे आणि वॉशिंग्टन सुंदर, जितेश शर्मा, वरुण चक्रवर्ती आणि अर्शदीप सिंग देखील आनंदी मूडमध्ये मॉलमध्ये दिसले. या सगळ्या खेळाडूंमध्ये, मॉलमध्येल प्रेक्षक, चाहते हे टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरला शोधत होते.
लखनऊनध्ये आज चौथा सामना
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील चौथा सामना आज (17 डिसेंबर 2025) लखनौमध्ये खेळला जाणार आहे. म्हणूनच भारतीय संघ लखनौमध्ये आहे. आत्तापर्यंत लखनौमध्ये एकूण सहा टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. भारतीय संघाने तीन टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, तर अफगाणिस्तानने उर्वरित सामने खेळले आहेत. आजचा सामना जिंकून विजयी आघाडी मिळवण्याची टीम इंडियाला संधी आहे.