
टीम इंडियाच्या महिला क्रिकेट टीमची कर्णधार मिताली राज. मितालीने आपल्या कामगिरीने क्रिकेट विश्वात आपली छाप सोडली आहे. मितालीने नुकत्याच दक्षिण आफ्रिका विरुद्ध झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात 85 चेंडूत 4 चौकार आणि 1 षटकारासह 50 धावांची अर्धशतकी खेळी केली.

हे अर्धशतक मितालीच्या कारकिर्दीतील 54 वं अर्धशतक ठरलं. मितालीने 210 व्या सामन्यात ही कामगिरी केली. यासह मिताली महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतक लगावणारी फलंदाज ठरली.

सर्वाधिक वनडे अर्धशतकांच्या बाबतीत मितालीने हिटॅमन रोहित शर्माला केव्हाचंच पछाडलं आहे. रोहितने 224 सामन्यात 43 अर्धशतकं झळकावले आहेत. तर मितालीने 210 मॅचमध्ये 54 अर्धशतक लगावले आहेत.

मिताली सर्वाधिक एकदिवसीय अर्धशतकांच्या बाबतीत आता कर्णधार विराट कोहलीच्या मागे आहे. विराटने 251 सामन्यात 60 वेळा अर्धशतकी खेळी केली आहे. त्यामुळे मिताली विराटपासून अवघ्या 6 अर्धशतकांपासून दूर आहे.