
भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा मागील काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे तूफान चर्चेत आहे. सानिया मिर्झाने पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक याच्यासोबत लग्न केले. काही वर्ष दोघे एकमेकांना डेट करत होते. सानियाने शोएबसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. हेच नाही तर त्यावेळी तिच्यावर जोरदार टीकाही झाली होती. सानिया आणि शोएबला एक मुलगा देखील आहे. मात्र, अचानक शोएब मलिकने सोशल मीडियावर त्याच्या तिसऱ्या लग्नाचे फोटो शेअर केले आणि सर्वांना मोठा धक्का दिला. त्यापूर्वी सानिया आणि शोएबच्या घटस्फोटाची कोणतीही चर्चा नव्हती. पाकिस्तानी अभिनत्री सना जावेदसोबत शोएबने लग्न केले. सोशल मीडियावर सतत स्वत:ला प्रोत्साहित करणाऱ्या पोस्ट शेअर करताना सानिया त्यावेळी दिसली.
शोएब मलिकने तिसरे लग्न करण्याच्या अगोदर दोघांचा घटस्फोट झाल्याचे सानियाच्या वडिलांनी स्पष्ट केले होते. मात्र, सानिया आणि शोएबचा घटस्फोट कोणत्या कारणाने झाल्याचे स्पष्ट होऊ शकले नाही. शोएब अनेक महिलांना डेट करत असल्याने सानियाने कंटाळून घटस्फोट दिल्याचे सांगितले जाते. शोएबच्या बहिणीने एका मुलाखतीत स्पष्ट म्हटले होते की, शोएबचे काही महिलांसोबत संबंध असल्याने सानिया आणि शोएबमध्ये सतत वाद होत होता.
सानिया मिर्झाने घटस्फोटानंतर आपल्या खासगी आयुष्याबद्दल भाष्य करणे कायमच टाळले आहे. आता पहिल्यांदाच सानिया मिर्झा घटस्फोटाबद्दल मोठा खुलासा करताना दिसली. सानियाने तिच्या यूट्यूब शो सर्विग इट अप विद सानिया या तिच्या शोमध्ये घटस्फोटावर भाष्य केले. कोरियोग्राफर फराह खानसोबत बोलताना सांगितले की, सिंगल मदर होणे किती जास्त कठीण असते आणि घटस्फोटानंतर तिच्यासोबत काय घडत होते.
सानिया मिर्झा म्हणाली की, पती पत्नीमधील समस्यांचा परिणाम मुलांवर होतो. तुम्हाला याची निवड करावी लागते की, तुमच्या मुलांसाठी काय योग्य आहे. जर लेकरू दोन लोकांना त्रस्त बघत असेल तर तुम्हाला निर्णय घ्यावा लागतोच. जर तुम्हाला वाटत असेल की, मुलांसमोर तुम्ही खोटे बोलून राहू शकता तर हा नक्कीच मोठा पागलपणा आहे. कारण मुलांना सर्व समजते.
यावेळी आयुष्यातील वाईट काळात सानिया कशाप्रकारे खंबीर राहिली, यावर फराह खान तिचे काैतुक करताना दिसली. सानिया मिर्झाने 2010 मध्ये काही दिवस डेट केल्यानंतर शोएब मलिकसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. 2023 मध्ये तिने शोएबसोबत घटस्फोट घेतला. शोएबने तिसरे लग्न केले. मात्र, सानिया मिर्झा सिंगल मदर म्हणून जगते. शोएब मलिक कायमच तिसरी पत्नी सना जावेद हिच्यासोबतचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतो.