
आयपीएल 2025 चा सीझन अखेर संपला असून मंगळवारी रात्री अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात आरसीबीने ट्रॉफीवर नाव कोरलं. पंजाब किंग्सला 6 धावांनी हरवत आरसीबीने फायनल मॅच जिंकली आणि आयपीएलचं पहिलं विजतेपद मिळवलं. गेल्या 18 वर्षांपासून सतत आरीसीबी सोबत असलेल्या, अनेक पराभव, निराशा पचवलेल्या विराट कोहलीसाठी कालचा विजय खूपच खास होता. विराटने आयपीएल ट्रॉफी जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. गेल्या 17 हंगामात आरसीबीचा संघ तीन वेळा अंतिम फेरीत पोहोचला पण प्रत्येक वेळी यशाने त्यांना हुलकावणी दिली आणि आयपीएलचा चषक दुसऱ्याच संघाने जिंकला.
मात्र कालचा दिवस आरसीबीचा होता. सामना जिंकताच विराट चक्क मैदानात बसूनच रडू लागला. इतर खेळाडूंनी जल्लोष करत विजयाचा आनंद साजरा केला, विराटही थोड्या वेळाने त्यांच्यात सामील झाला. सामन्यानंतरच्या सेलिब्रेशननमध्ये विराटचा अनोखा अंदाज दिसला. पत्नी अनुष्काला मिठी मारून रडणाऱ्या विराटचे अनेक व्हिडीओ आणि फोटो तर व्हायरल झालेच पण रवी शास्त्री यांच्यासोबतचा त्याचा एक व्हिडीओही खूप खास असून तो पाहून तुमच्याही चेहऱ्यावर हसू फुलेल.
विराट कोहली आणि रवि शास्त्री
रवी शास्त्री हे क्रिकेटमध्ये विराट कोहलीच्या सर्वात जवळच्या व्यक्तींपैकी एक आहेत. विराटच्या कर्णधारपदाच्या काळात रवी शास्त्री बराच काळ टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक होते. 1983 च्या विश्वचषक विजेत्या संघाचा भाग असलेले रवी शास्त्री हे काल आयपीएलच्या फायनल मॅचदरम्यान कॉमेंट्री करत होते. मॅचचा निकाल लागला, आरसीबी जिंकली, त्यानंतर मैदानात विराटने रवी शास्त्री यांना पाहिलं आणि तो जणू अगदी लहान मुलगाच झाला. दूर उभ्या असलेल्या रवी शास्त्रींना पाहून विराट एखाद्या लहान मुलाप्रमाणे धावत तिथे गेला आणि उडी मारत रवी शास्त्रींना चक्क जादूची झप्पीच दिली.
VIRAT KOHLI & RAVI SHASTRI ❤️
THE MOST ICONIC BOND EVER!#RCBvsPBKS #ViratKohli𓃵 pic.twitter.com/V3xu3m5QmZ— Aditi Yadav (@aditiyadav_00) June 4, 2025
त्या दोघांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून त्यातून विराट आणि रवी शास्त्री यांचं प्रेमाचं अनोखं नातं दिसतं. विराटची कृती पाहून रवी शास्त्रीही हसत होते, त्यांनी त्याला घट्ट मिठीत घेतलं, थोपटलं, डोक्यावरही मायेने हात फिरवत त्याचं अभिनंदन केलं. तिथेच विराटची पत्नी, अभिनेत्री अनुष्का शर्माही उभी होती. विराट-रवी शास्त्री यांची भेट पाहून तिच्या चेहऱ्यावरही हसू फुललं, टाळ्या वाजवत तिने दोघांचही कौतुक केलं.
The way Virat Kohli run and hugged Ravi Shastri was precious. 🥹❤️#RCBvsPBKSfinal #ViratKohli𓃵 #IPLFinals pic.twitter.com/QMAL283Lbd
— Cricket With Manmohan (@GarhManmohan) June 4, 2025