
Virat Kohli Retirement : भारताचा माजी कर्णधार आणि नामवंत फलंदाज विराट कोहलीने याने कसोटी क्रिकेट फॉरमॅटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. गेल्या आठवड्यात बीसीसीआयशी चर्चा केल्यावरच विराटने निवृत्तीचे संकेत दिले होते. मात्र अखेर आज कसोटीतून रिटायर होण्याच्या निर्णयाची त्याने अधिकृत घोषणा केली. सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट लिहीत विराटने त्याच्या भावना व्यक्त केल्या आणि 14 वर्षांच्या कसोटी कारकिर्दीला ‘अलविदा’ केलं.
भारतासाठी 14 वर्ष कसोटी क्रिकेट खेळताना विराटने 123 टेस्ट मॅचेस खेळत 210 इनिंग्समध्ये 46.85 च्या रनरेटने 9230 धावा केल्या. 30 शतकं आणि 31 अर्धशतक झळकावणाऱ्या विराटची, 254 (नाबाद) ही सर्वोच्च धावसंख्या आहे. त्याच्या नेतृत्वात भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीवर हरवले होते आणि टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतही पोहोचला होता.
निवृत्तीचा निर्णय जाहीर करताना विराटची भावनिक पोस्ट
विराट म्हणाला,” 14 वर्षांपूर्वी मी पहिल्यांदा टेस्ट क्रिकेटसाठी ब्लॅगी ब्लू रंगाचा ड्रेस घातला होता. प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर या (कसोटी क्रिकेट) फॉरमॅटमध्ये माझा प्रवास असा असेल याची मी कधीच कल्पना केली नव्हती. या फॉरमॅटने माझी परीक्षा घेतली, मला जोखलं, मला घडवलं आणि आयुष्यभर उपयोगी असे धडेही शिकवले. ” असं विराटने लिहीलं.
” पांढऱ्या जर्सीत खेळणं हे माझ्यासाठी वैयक्तिक पातळीवर खूप खास होतं. मोठ-मोठे दिवस, आणि असे काही छोटे क्षण जे कोणी पाहत नाही पण ते कायम तुमच्यासोबत राहतात ” असंही विराटने पोस्टमध्ये नमूद केलं.
कोहली ने पोस्टमध्ये लिहीलं, ” या फॉरमॅटमधून निवृत्ती घेणं माझ्यासाठी निश्चितच सोपं नाही, पण मला हे (निर्णय)योग्य वाटतंय, हीच योग्य वेळ आहे. माझ्याकडे जे होतं ते सगळं मी ( कसोटी क्रिकेटला) दिलं आणि माझ्या अपेक्षेपेक्षा मला खूप जास्त परत मिळालं आहे. कृतज्ञतेने भरलेल्या मनाने मी निवृत्त होत आहे. हा खेळ, मी ज्या-ज्या लोकांसोबत मैदान शेअर केलं ते आणि या प्रवासात वाटेत दिसलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी मी कृतज्ञता व्यक्त करतो ” असंही विराटने लिहीलं.
सर्वात शेवटी विराट म्हणाला, ” माझ्या कसोटी करिअरकडे मी नेहमी हसतमुखाने पाहीन.”
विराटच्या या पोस्टवर लाखो लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव झाला असून अनेकांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
रोहित पाठापोठ विराट निवृत्त
गेल्या आठवड्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने निवृत्तीचा निर्णय जाहीर केला होता. त्याच्यापाठोपाठ विराटनेही कसोटीतून निवृत्तीचे संकेत दिले, बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी त्याच्याशी चर्चा करत मनधरणी करण्याचे प्रयत्न केले. निवृत्तीचा निर्णय घेण्यापासून त्याला रोखण्याचा प्रयत्नही केला, मात्र विराट त्याच्या निर्णयावर ठाम राहिला आणि अखेर आज त्याने निवृत्ती जाहीर केली.