
Mohammad Kaif BCCI : भारताचा तडाखेबंद फलंदाज विराट कोहली याने 12 मे रोजी कसोटी क्रिकेटला रामराम ठोकले. त्याच्या निवृत्ती ही अजून क्रिकेट जगताला आणि त्याच्या चाहत्यांना पचनी पडलेली नाही. त्याने अचानक निवृत्ती जाहीर केल्याने त्यावर उलटसुलट चर्चा होत आहेत. BCCI आणि निवड समिती पण किंगच्या या निर्णयावर हैराण आहे. ऐन इंग्लंड दौऱ्यापूर्वी विराटच्या निवृत्तीच्या घोषणेने अनेकांना यामध्ये कुणाचा तरी कुटिल डाव असल्याचा संशय येत आहे. त्यातच माजी भारतीय क्रिकेटर मोहम्मद कैफ याने एक बॉम्ब टाकला आहे. विराट हा इंग्लंड दौर्यावर जाण्यास इच्छुक होता आणि त्याला कसोटी खेळायची होती असा दावा त्याने केला आहे. त्यातच त्याने अजून एक गौप्यस्फोट केला आहे.
मोहम्मद कैफचा दावा काय?
मला वाटते की विराट हा टेस्ट क्रिकेट खेळू इच्छित होता, असे कैफ म्हणाला. बीसीसीआय अंतर्गत काहीतरी चर्चा झाली असेल. निवडकर्त्यांनी गेल्या 5-6 वर्षांच्या त्याची कामगिरी दाखवत कदाचित ठरवले असेल की त्याचे संघात आता काही स्थान नाही. काय आपण कधीच माहिती करून घेऊ शकत नाही की, पडद्यामागे काय झाले? पडद्यामागे काय झाले, याचा आताच अंदाज बांधणे कठीण आहे, असे कैफ म्हणाला. विराट कोहली हा टेस्ट क्रिकेट खेळू इच्छित होता. पण अजित अगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीचे त्याला समर्थन मिळवता आले नसल्याचे कैफने ध्वनित केले.
कोहलीची ढासळती कामगिरी
कोहली हा गेल्या पाच वर्षांपासून फॉर्ममध्ये नाही. त्याने 68 सामने खेळले आणि त्यात 2028 धावा केल्या. त्यात त्याच्या तीन शतकांचा समावेश आहे. त्याची सरासरी कामगिरी घसरून 46 वर आली आहे. ऑस्ट्रेलियातील पर्थ कसोटीत त्याने शतक ठोकून पुन्हा फॉर्ममध्ये येण्याची तयारी दाखवली. पण त्यानंतर त्याला प्रभावी कामगिरी करता आली नाही. तो केवळ 90 धावा करू शकला. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये भारताला 1-3 अशा फरकाने पराभव पत्करावा लागला. कैफचा दावा आहे की, ऑस्ट्रेलियात कोहलीच्या मानसिक स्थितीवरून हे लक्षात येते की, तो कसोटी सामन्यात थकलेला होता.
संयमाचा अभाव
या 2024-25 मधील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत कोहलीला धावा काढण्याची कोण घाई दिसत होती, असे कैफ म्हणाला. तुम्ही तासनतास बाहेर राहता आणि कोसटीत मग्न होता., जे त्याने यापूर्वी सुद्धा केले आहे. पण या कसोटीत त्याची शैली पाहता त्याच्यात संयमाचा मला मोठा अभाव दिसला, असे कैफ म्हणाला.
पूर्वी कोहली हा गोलंदाजाला अगोदर थकवून टाकायचा. त्यांच्या संयमाची कसोटी लागायची. गोलंदाज थकला की मग कोहली त्याच्या गोलंदाजीचे पिसं काढायचा. पण ऑस्ट्रेलियात असे काही दिसले नाही. त्याने एक शतक ठोकले. पण त्याचा काय उपयोग झाला? तो स्लिपमध्ये वारंवार आऊट झाल्याने त्याला मैदानात फार काळ थांबता आले नाही. त्यामुळेच कदाचित बीसीसीआयने त्याच्या इच्छेकडे दुर्लक्ष केले असेल, असे कैफला वाटते.