WCL 2025 : सेमीफायनलमध्ये भारत पाकिस्तानविरुद्ध भिडणार की न खेळताच मिळणार फायनलचं तिकीट ?
WCL 2025 : भारत आणि पाकिस्तानने वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स (WCL) 2025 च्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. या दोघांमधील पहिला सेमीफायनल 31 जुलै रोजी बर्मिंगहॅम येथे खेळला जाईल, परंतु हा सामना होईल की नाही याबद्दलच आता शंका आहे.

वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स (WCL) 2025 ही स्पर्धा पुन्हा एकदा 20 जुलै च्या त्याच टप्प्यावर आहे. 20 जुलै रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार होता, परंतु भारतीय खेळाडूंनी या सामन्यात खेळण्यास नकार दिला, त्यानंतर सामना रद्द करण्यात आला. आता 10 दिवसांनंतर, WCL समोर पुन्हा तीच समस्या निर्माण झाली आहे, कारण भारत आणि पाकिस्तान या संघांनी या लीगच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे आणि या दोघांमध्ये 31 जुलै रोजी पहिला सेमीफायनल सामना खेळवाला जाईल, परंतु आता पुन्हा एकदा तोच प्रश्न निर्माण झाला आहे की भारत पाकिस्तानविरुद्ध सामना खेळेल का? की न खेळताच पाकिस्तानला अंतिम फेरीचे तिकीट मिळेल ?
पहिली सेमीफायनल होणार का ?
22 एप्रिल रोजी काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केले आणि पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. यानंतर दोन्ही देशांमधील संबंध बिघडले, त्याचा परिणाम खेळांवरही झाला. WCL 2025 च्या लीग सामन्यात, भारतीय खेळाडूंनी 20 जुलै रोजी पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार दिला. यानंतर, WCL च्या आयोजकांना हा सामना रद्द करावा लागला आणि भारतीय चाहत्यांची माफी मागावी लागली.
आता हे दोन्ही संघ पुन्हा आमने-सामने आले आहेत. या दोन्ही संघादरम्यान 31 जुलै रोजी बर्मिंगहॅममध्ये WCL चा पहिला सेमीफायनल सामना रंगणार आहे. पण भारत पिकास्तानविरुद्धची ही मॅच खेळेल का ? हा सर्वात मोठा प्रश्न सध्या आहे. जर भारतीय संघाने हा सामना खेळला नाही तर पाकिस्तानी संघ न खेळताच फायनलमध्ये पोहोचेल. मात्र, इंडिया चॅम्पियन्सचा सलामीवीर शिखर धवनने काही दिवसांपूर्वी या प्रकरणावर आपले मत स्पष्ट केलं होतं.
काय म्हणाला शिखर धवन ?
अलिकडेच, माजी भारतीय क्रिकेटपटू शिखर धवनला विचारण्यात आलं होतं की, जर (भारतीय) संघ उपांत्य फेरीत पोहोचला आणि पाकिस्तानशी सामना होणार असेल तर संघ पुन्हा खेळण्यास नकार देईल का ? यावर शिखर धवनने नाराजी व्यक्त करत सडेतोड उत्तर दिले, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
तु्म्ही हा प्रश्न अतिशय चुकीच्या वेळी आणि चुकीच्या जागी विचारत आहाद. तुम्ही हे विचारायलाच नको होतं, पण आता प्रश्न विचारलाच आहे तर मी सांगू इच्छितो की मी आधीही (पाकिस्तानविरुद्ध सामना) खेळलो नाहीये, मग आताही खेळणार नाहीच, असं शिखर धवन म्हणाला. यापूर्वी, धवनशिवाय, संघातील इतर खेळाडूंनी पाकिस्तानविरुद्ध लीग सामन्यात खेळण्यास नकार दिला होता. त्यानंतर WCL च्या आयोजकांना माफी मागावी लागली.
WCL ने मागितली माफी
20 जुलै रोजी भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार दिला. त्यानंतर सामना रद्द करण्यात आला. यानंतर WCL च्या आयोजकांनी सोशल मीडियावर भारताच्या दिग्गज क्रिकेटपटू आणि चाहत्यांची माफी मागितली. WCL मध्ये आम्ही नेहमीच क्रिकेटला महत्त्व दिले आहे आणि त्यावर प्रेम केले आहे. आमचे एकमेव ध्येय चाहत्यांना आनंदाचे क्षण देणे आहे असे त्यांनी लिहीलं होतं.
ते म्हणाले की, यावर्षी पाकिस्तान हॉकी संघ भारतात येत असल्याची बातमी ऐकल्यानंतर आणि भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अलिकडेच झालेला व्हॉलीबॉल सामना पाहिल्यानंतर, आम्ही WCL मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना आयोजित करण्याचा विचार केला. जेणेकरून चाहत्यांना काही चांगल्या आठवणी मिळाव्यात. परंतु या प्रयत्नात आपण अनेक लोकांच्या भावना दुखावल्या असतील आणि त्यांच्या भावना भडकवल्या असतील. याबद्दल आम्ही सर्वांची माफी मागतो, असे त्यांनी नमूद केलं होतं.
अशी होऊ शकते सेमीफायनल
मीडिया रिपोर्ट्सनुसार, WCL सेमीफायनल सामन्यांमध्ये काही बदल करू शकते. सेमीफायनलचे दोन्ही सामने बर्मिंगहॅममध्ये होणार आहेत. दुसरा सेमीफायनल सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, WCL चे आयोजक भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला उपांत्य सामना खेळवणार नाहीत नाहीत आणि त्याऐवजी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांसोबत सेमीफायनल खेळवतील.
म्हणजेच भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होऊ शकतो आणि पाकिस्तान हा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळू शकतो. मात्र, जरी असे झाले तरी, भारत आणि पाकिस्तान अंतिम फेरीत पोहोचल्यास पुन्हा तीच परिस्थिती उद्भवेल. अशा परिस्थितीत, यावेळी WCL समोर एक मोठी समस्या निर्माण होऊ शकते.
