विराट आणि सचिनची तुलना अशक्य : हरभजन सिंह

| Updated on: Jul 05, 2019 | 4:48 PM

औरंगाबाद : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांची तुलना करणं अत्यंत चूक असल्याचं मत क्रिकेटपटू हरभजन सिंहने व्यक्त केलंय. औरंगाबादला एका कार्यक्रमात बोलताना त्याने हे मत व्यक्त केलं. विराट कोहलीचा काळ आणि सचिनचा काळ यात जमीन आसमानचा फरक असल्याचं तो म्हणाला. सचिन तेंडुलकर खेळत होता तो काळ अत्यंत कठीण होता. […]

विराट आणि सचिनची तुलना अशक्य : हरभजन सिंह
Follow us on

औरंगाबाद : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांची तुलना करणं अत्यंत चूक असल्याचं मत क्रिकेटपटू हरभजन सिंहने व्यक्त केलंय. औरंगाबादला एका कार्यक्रमात बोलताना त्याने हे मत व्यक्त केलं. विराट कोहलीचा काळ आणि सचिनचा काळ यात जमीन आसमानचा फरक असल्याचं तो म्हणाला.

सचिन तेंडुलकर खेळत होता तो काळ अत्यंत कठीण होता. ऑस्ट्रेलिया, वेस्टइंडीज, श्रीलंका या टीममध्ये अत्यंत तगडे क्रिकेटर होते आणि त्यामुळे खेळ एक मोठी परीक्षा असायची. मात्र सध्याच्या काळात क्रिकेटचा स्तर खालावला आहे. खेळ मंदावला आहे आणि त्यामुळे खेळणं जास्त सोपं झालंय असं माझं मत असल्याचं हरभजन सिंह याने स्पष्ट केलं.

“सचिन हा सचिन आहे”

सचिन हा सचिन आहे.. सचिनची कोणतीही बरोबरी होऊ शकत नाही. सचिनने जगाला क्रिकेट दाखवलं, शिकवलं, असंही हरभजन म्हणाला. आताच्या काळातील क्रिकेटरचे नावंही लक्षात राहत नाही. सचिन खेळत होता तेव्हा क्रिकेटपटूचं नाव लोकांच्या तोंडावर असायचं. आता एक किंवा दोन क्रिकेटरची नावं आपण सांगू शकत नाही, अशी वेळ क्रिकेटवर आली असल्याचं तो म्हणाला. सचिन खेळला त्या काळी वकार यूनिस, वसीम अक्रम यांसारखे गोलंदाज त्याच्यासमोर असायचे आणि त्याने सगळ्यांसमोर खेळून विक्रम केला आहे. त्यामुळे सचिन आणि विराटची तुलना नकोच, असं हरभजन म्हणाला.

“खेळाला राजकारणापासून दूर ठेवा”

खेळाला राजकारणापासून दूर ठेवलं पाहिजे, असं मत हरभजन सिंहने व्यक्त केलं. या देशासोबत खेळू नका, त्या देशातसोबत खेळू नका यातून नक्की काय साध्य होतं हे मला कळत नसल्याचं हरभजन म्हणाला. पाकिस्तानसोबत खेळायला नेहमीच विरोध होतो, मात्र पाकिस्तानसोबत आपण इतर खेळ खेळत आहोत, असेही हरभजन म्हणाला.

“पाकिस्तानसोबत फक्त क्रिकेटलाच विरोध का?”

पाकिस्तानसोबत व्यापार चालतो, पाकिस्तानला जाण्याचे रस्ते उघडले जातात मग क्रिकेटलाच विरोध का? असा सवाल हरभजनने केला. त्यामुळे खेळाला राजकारणापासून पूर्णतः सोडायला हवं आणि खेळाडूंना त्यांचा खेळ खेळू द्यायला हवा, असं मत हरभजनने व्यक्त केलं. आता इमरान खान आणि सिद्धू हे दोन्हीही ज्येष्ठ क्रिकेटर राजकारणी झालेले आहे. त्यांनी तरी यावर तोडगा काढावा, असंही हरभजन म्हणाला.

सध्या लोक क्रिकेट पाहायला कमी येतात. याचं कारण म्हणजे होणारा सातत्याने खेळ हाच आहे. आता प्रत्येक दोन-तीन दिवसांनंतर दोन-तीन महिन्यानंतर भारत कोणासोबत तरी खेळत असतो. त्यामुळे आता किती सामने पाहावे असाही प्रश्न लोकांना पडला असल्याचं हरभजन म्हणाला.

“भारतीय संघ आहे त्याच जागी”

आमच्या काळी अनेक क्रिकेट टीम अत्यंत तगड्या होत्या. त्यामुळे लोकांना या तगड्या मॅचेस पाहायला आवडायचं. मात्र आता क्रिकेटचा दर्जा घसरला आहे. त्यामुळे कदाचित भारतीय टीम मजबूत झाली आहे, किंवा भारतीय टीम आहे त्या जागीच आहे आणि इतर टीमचा दर्जा घसरला आहे म्हणून कदाचित आपण मोठे झालो असू शकतो, असंही हरभजन म्हणाला.