Video | कायरन पोलार्डचा तडाखा, 6 चेंडूत 6 सिक्स, युवराजच्या विक्रमाशी बरोबरी

| Updated on: Mar 04, 2021 | 10:49 AM

कायरन पोलार्डने 6 चेंडूत 6 गगनचुंबी (Kieron Pollard Hit 6 Six) षटकार खेचले. यासह पोलार्ड टी 20 क्रिकेटमध्ये (T 20) अशी कामगिरी करणारा दुसराच फलंदाज ठरला.

Video | कायरन पोलार्डचा तडाखा, 6 चेंडूत 6 सिक्स, युवराजच्या विक्रमाशी बरोबरी
कायरन पोलार्डने 6 चेंडूत 6 गगनचुंबी (Kieron Pollard Hit 6 Six) षटकार खेचले. यासह पोलार्ड टी 20 क्रिकेटमध्ये (T 20) अशी कामगिरी करणारा दुसराच फलंदाज ठरला.
Follow us on

अँटिंगा : वेस्ट इंडिजचा आक्रमक अष्टपैलू खेळाडू आपल्या तडाखेदार फलंदाजीसाठी ओळखला जातो. पोलार्डने आपल्या या तडाखेदार फलंदाजीचं दर्शन श्रीलंका विरुद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यामध्ये घडवले. पोलार्डने या सामन्यात 6 चेंडूत 6 सिक्स ठोकण्याचा पराक्रम केला आहे. यासह पोलार्ड आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तिसरा तर टी 20 मधील दुसरा फलंदाज ठरला आहे. (west indies vs sri lanka 1st t 20 kieron pollard hit 6 six in one over)

पोलार्डने श्रीलंकेच्या अकिला धनंजयाच्या ( Akila Dananjaya) बोलिंगवर 6 चेंडूत 6 गगनचुंबी सिक्स खेचले. यासह पोलार्डने युवराज सिंह आणि हर्षल गिब्सच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. युवराज सिंहने 2007 मध्ये इंग्लंड विरुद्धच्या टी 20 सामन्यात ही खेळी केली होती. तर हर्षल गिब्सने नेदरलंड विरुद्ध 50 ओव्हरच्या सामन्यात हा कारनामा केला होता.

श्रीलंका विरुद्ध विंडिज यांच्यात 3 मार्चला टी 20 मालिकेतील पहिला सामना खेळवण्यात आला. पोलार्डने या सामन्यात विजयी आव्हानाचे पाठलाग करताना ही कामगिरी केली. श्रीलंकेचा अकिला धनंजया सामन्यातील 6 वी ओव्हर टाकायला आला. या ओव्हरमध्ये पोलार्डने आपलं रौद्र रुप धारण केलं. पोलार्डने एकामागोमाग एक असे उत्तुंग षटकार खेचयला सुरुवात केली. क्रिकेट चाहत्यांना आपण रिप्ले पाहतोय की काय, असंच वाटू लागले होते. पोलार्डने हे 6 सिक्स मैदानातील वेगवेगळ्या दिशेला मारले. यासह पोलार्डने युवराजच्या 6 सिक्स मारण्याच्या विक्रमाची 14 वर्षानंतर बरोबरी केली.

विंडिजचा 4 विकेट्सने विजय

या सामन्यात विंडिजने श्रीलंकेवर 4 विकेट्सने विजय मिळवला. विंडिजने टॉस जिंकून प्रथम श्रीलंकेला बॅटिंगसाठी भाग पाडले. श्रीलंकेने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 131 धावला केल्या. यामुळे विंडिजला विजयासाठी 132 धावांचे माफक आव्हान मिळाले. विंडिजच्या सर्व गोलंदाजांनी विकेट मिळवली. तर श्रीलंकेकडून पथुम निशंकाने सर्वाधिक 39 धावांची खेळी केली.

अकिला धनंजयाची हॅटट्रिक

विजयी आव्हानाचे पाठलाग करायला आलेल्या विंडिजची शानदार सुरुवात राहिली. लेंडी सिमन्स आणि एविन लेविस या सलामी जोडीने 51 धावांची सलामी भागीदारी केली. मात्र त्यानंतर अकिला धनंजयाने आपला जलवा दाखवला. त्याने ही जोडीच फोडली नाही तर सलग 3 चेंडूत 3 विकेट्स घेतल्या. म्हणजेच अकिलाने हॅटट्रिक घेतली. त्याने अनुक्रमे एविन लेव्हिस, युनिव्हर्स बॉस (0) आणि निकोलस पूरन (0) या तिघांना मैदाना बाहेरचा रस्ता दाखवला. अकिलाने मॅचच्या चौथ्या ओव्हरमधील दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर या फलंदाजांना बाद केलं.

पोलार्डची वादळी खेळी

अकिलाने विंडिजला सलग 3 धक्के दिल्याने विंडिजचा डाव गडगडला. माफक आव्हान अवघड वाटू लागले होते. पण कर्णधार पोलार्डने आपल्या लौकीकाला साजेशी कामगिरी केली. पोलार्डने अकिलाचा चांगलाच समाचार घेतला. पोलार्डने हॅटट्रिकचा वचपा घेतला. त्याने अकिलाला चोप चोपत 6 सिक्स खेचले. पोलार्डने या सामन्यात एकूण 11 चेंडूत 6 सिक्सच्या मदतीने 38 धावा केल्या.

पोलार्डच्या या खेळीने विंडिजचा डाव सावरला. त्याच्या या खेळीमुळे विंडिजचा विजय आणखी सोपा झाला. पोलार्ड बाद झाल्यानंतर जेसन होल्डरने आपल्या खांद्यावर संघाची जबाबदारी घेतली. त्याने विजय मिळवून देण्यात हातभार लावला. होल्डने नाबाद 29 धावांची खेळी केली. यासह विंडिजने 132 धावांचे आव्हान 6 विकेट्सच्या मोबदल्यात 41 चेंडूआधी विजय साकारला. या विजयासह विंडिजने विजयी सुरुवात केली. यासह विंडिजने या 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. दरम्यान या मालिकेतील दुसरा सामना हा 5 मार्चला खेळवण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या :

WI vs SL | गेलची देशासाठी PSL मधून माघार, आक्रमक गोलंदाजाचं 9 वर्षानंतर कमबॅक, श्रीलंका विरुद्धच्या टी 20 सीरिजसाठी विंडिजची घोषणा

(west indies vs sri lanka 1st t 20 kieron pollard hit 6 six in one over)