पुजाराला बाद करणारा 140 किलो वजनाचा हा क्रिकेटर कोण आहे?

| Updated on: Aug 30, 2019 | 9:52 PM

भारताची धावसंख्या 46 असताना कॉर्नवॉलने चेतेश्वर पुजाराला सहा धावांवर माघारी पाठवलं. क्रिकेटमधील हा सर्वात वजनदार खेळाडू आहे. कॉर्नवॉलने वजनाच्या बाबतीत ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार वारविक आर्मस्ट्राँग यांनाही मागे टाकलंय. त्यांचं वजन 133 ते 139 किलो दरम्यान होतं.

पुजाराला बाद करणारा 140 किलो वजनाचा हा क्रिकेटर कोण आहे?
Follow us on

जमैका : वेस्ट इंडिज विरुद्ध भारत कसोटी यजमान संघाकडून 140 किलो वजनाच्या गोलंदाजाने (Rahkeem Cornwall heaviest cricketer) पदार्पण केलंय. पहिल्याच सामन्यात रहकीम कॉर्नवॉलने (Rahkeem Cornwall heaviest cricketer) भारताच्या स्टार खेळाडूला माघारी पाठवलं. भारताची धावसंख्या 46 असताना कॉर्नवॉलने चेतेश्वर पुजाराला सहा धावांवर माघारी पाठवलं. क्रिकेटमधील हा सर्वात वजनदार खेळाडू आहे. कॉर्नवॉलने वजनाच्या बाबतीत ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार वारविक आर्मस्ट्राँग यांनाही मागे टाकलंय. त्यांचं वजन 133 ते 139 किलो दरम्यान होतं.

वेस्ट इंडिजने दुसऱ्या कसोटीत नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. अंतिम 11 खेळाडूंमध्ये कॉर्नवॉलला स्थान देण्यात आलंय. हा 26 वर्षीय अष्टपैलू खेळाडू आहे. कॉर्नवॉल गोलंदाजीत तर कमाल दाखवतोच, शिवाय त्याचे षटकार मारण्याची शैलीही प्रसिद्ध आहे. लांब पल्ल्याचे षटकार मारण्यासाठी तो प्रसिद्ध आहे.

लीवार्ड आयस्लँडचं प्रतिनिधित्व करताना कॉर्नवॉलने 55 सामन्यात 2224 धावा केल्या, शिवाय 260 विकेट्सही त्याच्या नावावर आहेत. यापूर्वी भारत विरुद्ध वेस्ट इंडिज बोर्ड XI या 2016 मध्ये झालेल्या सामन्यात कॉर्नवॉल चर्चेत आला होता. या सामन्यातील पहिल्या डावात त्याने 41 धावांसह विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांना बाद करत एकूण 5 विकेट घेतल्या होत्या.

अत्यंत दर्जेदार खेळाडू असूनही कॉर्नवॉलला त्याच्या वजनामुळे मोठा संघर्ष करावा लागला. पण त्याच्या कामगिरीने निवडकर्त्यांना खुणावलं आणि राष्ट्रीय संघाची दारं त्याच्यासाठी खुली झाली. भारताविरुद्ध पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यात पदार्पण करण्याची संधी त्याला मिळाली, ज्याचं त्याने सुरुवातीलाच सोनं केलंय.