
जगभरातील iPhone वापरणाऱ्यांसाठी एक गंभीर सायबर अलर्ट Apple कंपनीने जारी केला आहे. विशेष म्हणजे, हा धोका कोणत्याही सामान्य व्हायरस किंवा मालवेअरचा नाही, तर अत्यंत प्रगत आणि लक्ष्यित ‘मर्सनरी स्पायवेअर अटॅक’चा आहे. 150 हून अधिक देशांतील वापरकर्त्यांना सावध राहण्याचा इशारा Apple कडून देण्यात आला असून, यामागील उद्दिष्ट विशिष्ट व्यक्तींवर हेरगिरी करणं हेच आहे.
हे सॉफ्टवेअर सामान्य मालवेअरपेक्षा वेगळं आहे. ‘मर्सनरी स्पायवेअर’ हे खास डिझाइन केलं जातं विशिष्ट लोकांना लक्ष्य करण्यासाठी – जसे की पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, शासकीय अधिकारी किंवा मोठ्या कंपन्यांचे प्रमुख. यामागे असणारे गट अत्यंत सुसज्ज असतात – त्यांच्याकडे निधी, तंत्रज्ञान आणि कौशल्य असतं. हे स्पायवेअर एकदा तुमच्या iPhone मध्ये घुसलं, की कोणतीही पूर्वसूचना न देता तुमचे कॉल्स, संदेश, फोटो आणि लोकेशन माहिती हेरगिरीसाठी वापरण्यात येऊ शकतात.
Apple या हल्ल्यांना गंभीरतेने घेत असून, संभाव्य धोक्याच्या स्थितीत थेट संबंधित वापरकर्त्यांना ईमेल किंवा iMessage द्वारे सूचित करत आहे. तुम्ही तुमच्या iPhone मधील सुरक्षेसंदर्भातील कोणतीही शंका असल्यास account.apple.com वर लॉगिन करून अलर्ट तपासू शकता. कंपनीच्या सुरक्षा पथकाकडून 24×7 मदत मिळू शकते, आणि शक्य तितक्या लवकर धोका रोखण्याचा प्रयत्न केला जातो.
जरी सध्या या स्पायवेअरचा धोका विशिष्ट लोकांपर्यंत मर्यादित असला, तरी प्रत्येक iPhone वापरकर्त्याने काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. कोणत्याही अनोळखी लिंक्स किंवा मेसेजेसवर क्लिक करू नका. Apple चं सॉफ्टवेअर अपडेट वेळेवर करा. तुमच्या Apple ID मध्ये संशयास्पद लॉगिन्स किंवा अॅक्टिव्हिटी नियमित तपासा.