दिवाळीच्या मुहूर्तावर गाडी खरेदीचा प्लॅन करताय? EMI वर घेताना ‘या’ चुका टाळा, अन्यथा वाढू शकतो आर्थिक ताण
दिवाळीच्या मुहूर्तावर नवीन कार किंवा बाईक खरेदी करण्याचा विचार करताय? वाहन खरेदीसाठी लोन घेणार असाल, तर EMI ठरवताना काही चुका टाळणे आवश्यक आहे. अन्यथा कमी EMI च्या नादात तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागू शकतात.

दिवाळीच्या सणानिमित्त अनेक जण नवीन कार किंवा बाईक खरेदी करण्याचा विचार करतात. या काळात वाहन कंपन्या आणि डीलरकडून विविध ऑफर्स दिल्या जातात. एक रकमी पैसे खर्च करायचे नसल्यास अनेक जण कर्ज किंवा EMI चा पर्याय निवडतात. मात्र, कमी EMI पाहून घाईने निर्णय घेतल्यास आर्थिक बजेट बिघडू शकते. त्यामुळे वाहनाची किंमत, व्याज, विमा आणि मेंटेनन्स यासारखे खर्चही लक्षात घेणे आवश्यक आहे. त्यामुळे दिवाळीत कार किंवा बाईक खरेदी करण्यापूर्वी कर्ज घेताना या चुका टाळा.
फक्त कमी EMI पाहून कर्ज घेऊ नका
गाडी खरेदी करताना अनेक जण दरमहा किती हप्ता भरावा लागेल, याला प्राधान्य देतात. मात्र, कमी EMI म्हणजे कर्ज स्वस्त आहे असे नाही. कर्जाचा कालावधी जास्त असल्यास एकूण व्याजाची रक्कम वाढू शकते. त्यामुळे कर्ज घेण्यापूर्वी व्याजदर, परतफेडीचा कालावधी आणि एकूण भरावी लागणारी रक्कम तपासा. EMI मुळे घरखर्चावर परिणाम होणार नाही, याचीही काळजी घ्या.
डाउन पेमेंटसाठी संपूर्ण बचत खर्च करू नका
जास्त डाउन पेमेंट भरल्यास कर्जाची रक्कम आणि EMI कमी होऊ शकते. मात्र, त्यासाठी संपूर्ण बचत खर्च करणे टाळा. अचानक पैशांची गरज भासल्यास अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे डाउन पेमेंट भरल्यानंतरही आपत्कालीन परिस्थितीसाठी पुरेशी बचत शिल्लक ठेवा.
कर्जाच्या अटी आणि शुल्क तपासा
केवळ व्याजदर आणि EMI पाहून कर्ज घेऊ नका. प्रोसेसिंग शुल्क, कागदपत्रांचे शुल्क आणि इतर लागू खर्चांची माहिती घ्या. व्याजदर फिक्स्ड आहे की फ्लोटिंग, तसेच मुदतीपूर्वी कर्ज फेडल्यास अतिरिक्त शुल्क आकारले जाते का, हे तपासा. वेगवेगळ्या बँका आणि फायनान्स कंपन्यांच्या ऑफर्सची तुलना करा.
कर्जाचा कालावधी योग्य निवडा
कमी EMI मिळावी म्हणून कर्जाचा कालावधी वाढवल्यास एकूण व्याज अधिक भरावे लागू शकते. कमी कालावधीच्या कर्जात EMI जास्त असू शकते. त्यामुळे मासिक उत्पन्न, घरखर्च आणि इतर आर्थिक जबाबदाऱ्या लक्षात घेऊन कर्जाचा कालावधी ठरवा.
दिवाळीच्या ऑफर्स पाहून लगेच बुकिंग करू नका
दिवाळीत कार आणि बाईकवर कॅश डिस्काउंट, एक्सचेंज बोनस किंवा फायनान्स ऑफर्स मिळू शकतात. मात्र, प्रत्येक ऑफरच्या अटी वेगळ्या असू शकतात. त्यामुळे बुकिंगपूर्वी अटी तपासा. वाहनाच्या ऑन-रोड किमतीत विमा, नोंदणी आणि इतर शुल्कांचा समावेश करून एकूण खर्च मोजा. केवळ सवलतीच्या आमिषाला बळी न पडता आपल्या बजेटनुसार वाहन खरेदी करा
