कू अ‍ॅपचे चीनशी कनेक्शन ?, यूजर्सचा डेटा लीक करीत असल्याचा संशय

कू अ‍ॅपचे चीनशी कनेक्शन ?, यूजर्सचा डेटा लीक करीत असल्याचा संशय (China is suspected of leaking koo app users data)

  • Updated On - 1:27 pm, Thu, 11 February 21
कू अ‍ॅपचे चीनशी कनेक्शन ?, यूजर्सचा डेटा लीक करीत असल्याचा संशय
भारतीयांचा डेटा लीक

नवी दिल्ली : कुरापतखोर चीन कुठल्या मार्गाने आपल्यापर्यंत पोहोचेल, याचा नेम राहिला नाही. भारताच्या बाजारपेठेत सध्या तितकासा प्रतिसाद मिळत नसलेल्या चीनने आता कू अ‍ॅपशी कनेक्शन जोडल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. कू अ‍ॅप हे आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत अ‍ॅप असल्याच्या विश्वासातून युजर्स याचा मोठ्या प्रमाणावर वापर करीत आहेत. परंतु या अ‍ॅपने भारतीयांच्या विश्वासाला तडा दिला आहे. हे अ‍ॅप भारतीयांचा डेटा लीक करीत आहे. चीनसाठी हा डेटा लीक केला जात असल्याचा संशय आहे. त्यामुळे कू अ‍ॅप वापरात असाल तर जरा जपून राहा. (China is suspected of leaking koo app users data)

नेमके काय घडलंय?

कू अ‍ॅपने मागील 24 तासांत 30 लाख डाउनलोड्सचा रेकॉर्ड तयार केला आहे. फ्रान्समधील सायबर सिक्युरिटी तज्ज्ञ रॉबर्ट बॅप्टिसे यांनी हे अ‍ॅप सुरक्षित नसल्याचा दावा केला आहे. या अ‍ॅपने युजर्सचे ईमेल आयडी, फोन नंबर, जन्मतारीख आदी संवेदनशील डेटा लीक करण्याचा छुपा कारनामा सुरू केला आहे. बॅप्टिसे हे ट्विटरवर एलियट अ‍ॅण्डरसन नावाने ओळखले जातात. त्यांनी आधार कार्डच्या सिस्टममधील त्रुटींची पोलखोल केली होती. त्यावेळी ते चांगलेच चर्चेत आले होते.

सायबर सिक्युरिटी तज्ज्ञ बॅप्टिसे यांना आलेला अनुभव

बॅप्टिसे यांनी काल रात्री जवळपास 30 मिनिटे कू अ‍ॅपचा वापर केला. यावेळी त्यांना कू अ‍ॅप युजर्सचा वैयक्तीक गोपनीय डेटा लीक करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. यासंदर्भात त्यांनी काही स्क्रिनशॉट्सही शेअर केले आहेत. आतापर्यंत अनेक युजर्सचा डेटा लीक झाला आहे. यात केंद्र सरकारचे विविध विभाग तसेच मंत्र्यांचा डेटाही सामील आहे. कू अ‍ॅपचे चीनशी कनेक्शन असल्याचा दाट संशय आहे. मात्र यासंदर्भात अजून बॅप्टिसे यांना ठोस पुरावे हाती लागलेले नाहीत. डोमेन पाहिल्यानंतर त्याच्या काही भागांचा चीनशी कनेक्शन असल्याचा अंदाज येत आहे. या डोमेनची चार वर्षांपूर्वी निर्मिती करण्यात आली होती. आतापर्यंत हा डोमेन अनेक लोकांच्या हातात गेला आहे.

ड्रग्ज विकण्यासाठी होऊ शकतो डोमेनचा वापर

कू अ‍ॅपच्या डोमेनचा गैरकृत्यांसाठी वापर होण्याची भिती आहे. अवैध ड्रग्ज विक्रीसाठीही डोमेनचा उपयोग केला जाऊ शकतो. याआधी अशा प्रकारे बेकायदा कृत्ये करण्यात आली आहेत. अ‍ॅपमध्ये शुनवेईसारखा छोटा गुंतवणूकदार आहे. त्यामुळे अ‍ॅपचे चीनी कनेक्शन असल्याची शक्यता बळावली आहे. कू अ‍ॅप ही भारतातील रजिस्टर्ड कंपनी आहे. या कंपनीचे संस्थापक भारतीयच आहेत.

मंत्री, अभिनेतेही कू अ‍ॅप वापरताहेत

कू अ‍ॅपने अनेकांच्या जाळ्यात ओढले आहे. अगदी मंत्री, अभिनेतेही या अ‍ॅपचा वापर करू लागले आहेत. केंद्र सरकारने ट्विटरला 257 खाती ब्लॉक करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे आता ट्विटरचे युजर्स कू अ‍ॅपकडे वळले आहेत. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान, माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळे, अध्यात्मिक गुरु सद्गुरु जग्गी वासुदेव आदींचा कू अ‍ॅपच्या युजर्समध्ये समावेश आहे. (China is suspected of leaking koo app users data)

 

 

इतर बातम्या

आईचा लग्नाला नकार, सोलापुरात तरुणाकडून आत्तेबहिणीचा गळा आवळून खून

…जेव्हा आयपीएस अधिकारी सरकारी दवाखान्यात उपचार घेतात!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI